उस्मान ख्वाजाने वाजवला बाजा! ४३ वर्षापूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी, ऑस्ट्रेलियाने ७५ वर्षानंतर इतिहास घडवला

Ashes 2023 ENG vs AUS : ॲशेस मालिकेतील पहिली कसोटी ऑस्ट्रेलियाने २ विकेट्स राखून जिंकली. २८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्या दिवशीच इंग्लंडने ३ विकेट्स मिळवल्या. पाचव्या दिवशी पावसामुळे एक सत्र वाया गेले अन् त्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी कागारूंना धक्के दिले. ७१ धावांची गरज असताना भरवशाचा उस्मान ख्वाजा ( ६८) बाद झाला पण, त्याने मोठा विक्रम नोंदवला. कर्णधार पॅट कमिन्स ( ४४) अखेरपर्यंत खेळपट्टीवर चिटकून उभा राहिला अन् ऑस्ट्रेलियाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

बर्मिंगहॅमवर इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाने २८१ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. ॲशेस मालिकेतील हा त्यांचा चौथा सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग ठरला. १९४८ नंतर ऑस्ट्रेलियाची ही सर्वाधिक लक्ष्याचा पाठलाग ठरली. तेव्हा त्यांनी हेडिंग्ले कसोटीत ४०४ धावांचा पाठलाग केला होता. ॲशेस मालिकेत १९४९ ते २०२२ या कालावधीत ३१ वेळा ऑस्ट्रेलियाचा चौथ्या डावात २५०+ धावांच्या लक्ष्य मिळाले आणि त्यांना एकदाही ते पार करता आले नाही. १८ वेळा त्यांचा पराभवच झाला.

ऑस्ट्रेलियाने २०११ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २५०+ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. त्या सामन्यात पॅट कमिन्सने पदार्पण केले होते आणि त्याने चौकार खेचून विजय पक्का केला होता. २०११ ते २०२२ या कालावधीत ऑस्ट्रेलियाने २५०+ धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना २१ पैकी १९ कसोटी गमावल्या होत्या.

कालच्या पराभवाआधी इंग्लंडने सलग २६ इनिंग्जमध्ये प्रतिस्पर्धी संघाला चौथ्या डावात गुंडाळले होते. ही तिसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी १८८५ ते १८९६ या कालावधीत इंग्लंडने ५९ इनिंग्जमध्ये आणि ऑस्ट्रेलियाने १९९९ ते २००१ या कालावधीत ३३ इनिंग्जमध्ये हा पराक्रम केला होता.

दोन किंवा त्यापेक्षा कमी विकेट्स राखून ऑस्ट्रेलियाने मिळवलेला हा आठवा कसोटी विजय आहे. २०११ मध्ये त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध असा शेवटचा विजय मिळवला होता. त्यांनी ३१० धावांचे लक्ष्य ८ विकेट्सच्या मोबदल्यात पार केले होते. चौथ्या डावात ८ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेऊनही इंग्लंडला कसोटीत पराभव पत्करण्याची ही पाचवी वेळ ठरली.

ॲशेस मालिकेतील पहिला डाव घोषित केरणाऱ्या संघाची हार होण्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी १९८१ मध्ये ऑस्ट्रेलियाने पहिला डाव ८ बाद ४०१ धावांवर घोषित केला होता, परंतु त्यांना १८ धावांनी हार मानावी लागली, तर २००६मध्ये इंग्लंडने ६ बाद ५५१ धावांवर पहिला डाव घोषित करून ६ विकेट्सने मॅच गमावली होती.

या सामन्यात उस्मान ख्वाजाने ७९६ मिनिटं फलंदाजी केली आणि कसोटी क्रिकेटमधील ऑस्ट्रेलियन फलंदाजांची ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी १९९८ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या पेशावर कसोटीत मार्क टेलरने ९३८ मिनिटे फलंदाजी केली होती. उस्मान ख्वाजाने ॲशेस मालिकेत सर्वात जास्त वेळा फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांमध्ये चौथे स्थान पटकावताना बॉब सिम्पसन ( १९६४) यांचा ७६७ मिनिटांचा विक्रम मोडला.

उस्मान ख्वाजा हा कसोटीच्या पाचही दिवस फलंदाजी करणारा १३ वा फलंदाज ठरला. किम ह्युज ( १९८०) यांच्यानंतर ऑस्ट्रेलियासाठी असा पराक्रम करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला.

उस्मान ख्वाजाने या सामन्यात ५१८ चेंडूंचा सामना केला. २०१२ मध्ये रिकी पॉटिंगने एडिलेड कसोटीत ५००+ चेंडू खेळले होते आणि त्यानंतर ख्वाजाने हा पराक्रम केला. ॲशेस मालिकेतील एलिस्टर कूक ( ५९६ चेंडू, २०१०) याच्यानंतर ख्वाजाने ही कामगिरी केली.