Arjun Tendulkar: विराट-हार्दिक अन् ज्युनिअर तेंडुलकरचा फिटनेस; अर्जुनने पहिल्यांदाच दाखवले 'सिक्स पॅक ॲब्स'

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या खूप चर्चेत आहे. त्याने अलीकडेच रणजी ट्रॉफीमध्ये शतकी खेळी केली होती.

आजकाल भारतीय क्रिकेटपटूंमध्ये त्यांच्या खेळासोबतच फिटनेसबाबतही खूप क्रेझ आहे. विराट कोहली, केएल राहुल, हार्दिक पांड्या हे फिटनेसच्या बाबतीत अधिक तंदुरुस्त असल्याचे पाहायला मिळते. अनेकदा त्यांनी त्यांचे सिक्स पॅक ॲब्स दाखवले आहेत. या वरिष्ठ खेळाडूंना पाहून ज्युनिअर खेळाडूंनीही आपल्या फिटनेसकडे अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.

युवा खेळाडूंच्या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचे नाव आहे. अर्जुन सोशल मीडियावर त्याचे फार कमी फोटो आणि व्हिडीओ शेअर करतो, मात्र यावेळी त्याने त्याच्या सिक्स पॅक ॲब्सचा फोटो शेअर करून सर्वांनाच चकित केले आहे.

अर्जुन तेंडुलकरने याच महिन्यात रणजी ट्रॉफीमध्ये गोव्याच्या संघातून पदार्पण केले. पदार्पणातच शतक ठोकून त्याने वडील सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी साधली. 34 वर्षांपूर्वी सचिनने देखील रणजी पदार्पणात शतक झळकावण्याचा पराक्रम केला होता.

अर्जुन तेंडुलकरने आपल्या वडिलांप्रमाणे मुंबईतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली, परंतु तिथे संधी न मिळाल्याने तो गोव्यात गेला. अर्जुनला गोव्याच्या संघातून संधी मिळत असून त्याला आपली प्रतिभा दाखवण्याची संधीही मिळत आहे.

अर्जुनने रणजी ट्रॉफीच्या स्पर्धेत सहभाग घेण्यापूर्वी युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी त्याला मार्गदर्शन केले होते. युवराज सिंग आणि सचिन तेंडुलकरच्या सांगण्यावरून अर्जुनला ट्रेनिंग दिल्याचा खुलासा योगराज यांनी नुकताच एका मुलाखतीत केला होता.

योगराज सिंग यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते, "मी अर्जुनला प्रशिक्षण देताना सांगितले की त्याने पुढचे 15 दिवस विसरून जावे की तो सचिन तेंडुलकरचा मुलगा आहे. मी त्याला सांगितले की त्याला त्याच्या वडिलांच्या छायेतून बाहेर पडण्याची गरज आहे."