Ranji Trophy: अर्जुन तेंडुलकर ठरतोय 'फ्लॉप', पदापर्णात शतक अन् आता धावांचा 'दुष्काळ'

Arjun Tendulkar in Ranji Trophy: अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफी 2022-23 मध्ये गोव्यासाठी खेळताना पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावले.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने अलीकडेच रणजी ट्रॉफीच्या पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधले होते. मात्र, या शतकी खेळीनंतर अर्जुन धावा करण्यासाठी तरसत असल्याचे पाहायला मिळत आहे. अविस्मरणीय पदार्पणानंतर तो 4 सामन्यांत 10 धावांचाही आकडा गाठू शकला नाही.

खरं तर गोवा आणि केरळ यांच्यात सुरू असलेल्या सामन्याच्या दुसऱ्या डावात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. रणजी सामन्यात गोव्याने केरळचा 7 बळी राखून पराभव केला आहे. मात्र, या सामन्याच्या पहिल्या डावात अर्जुन केवळ 6 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

अर्जुनने मागील महिन्यात म्हणजे डिसेंबर 2022 मध्ये गोव्याच्या संघातून रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. अर्जुनने पदार्पणाच्याच सामन्यात शतक झळकावले, त्यानंतर त्याची तुलना सचिन तेंडुलकरशी झाली, पण तो पहिल्या सामन्यातील फॉर्म कायम राखू शकला नाही.

अर्जुन तेंडुलकरने रणजी पदार्पणाच्या सामन्यात राजस्थानविरुद्ध शानदार शतक झळकावले. यासह त्याने सचिन तेंडुलकरच्या 34 वर्षांच्या जुन्या विक्रमाची बरोबरी केली, कारण सचिन तेंडुलकरने देखील आपल्या पहिल्या रणजी सामन्यात शतक झळकावले होते.

अर्जुनने शतक झळकावताच तो प्रसिद्धीच्या झोतात आला. अष्टपैलू अर्जुन तेंडुलकरने राजस्थानविरूद्धच्या सामन्यात 120 धावांची खेळी केली होती. याशिवाय त्याने 104 धावा देऊन 3 बळी पटकावले होते.

यानंतर गोव्याचा सामना झारखंडशी झाला. झारखंडविरुद्धच्या सामन्यात डावखुरा फलंदाज अर्जुन केवळ 1 धाव काढून बाद झाला. तर गोलंदाजीमध्ये देखील त्याला अपयश आले आणि 90 धावा देऊन 1 बळी पटकावला.

यानंतर गोव्याच्या संघाचा पुढील सामना कर्नाटकसोबत झाला. त्या सामन्यात अर्जुन तेंडुलकर पहिल्याच चेंडूवर बाद झाला. अर्जुनने कर्नाटकविरुद्ध 79 धावा देऊन दोन बळी घेतले.

झारखंड आणि कर्नाटकविरूद्धच्या सामन्यानंतर देखील अर्जुन धावा करण्यासाठी संघर्ष करत आहे. केरळविरुद्धच्या पहिल्या डावात अर्जुन 8व्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि अवघ्या 6 धावा करून बाद झाला. तर त्याने केरळविरुद्ध 59 धावांत 2 बळी घेतले आहेत.

रणजी ट्रॉफीच्या या हंगामात पदार्पण करणारा अर्जुन अद्याप त्याची छाप सोडू शकला नाही. रणजीचा चालू हंगाम झाल्यानंतर अर्जुनला आयपीएल 2023 मध्ये संधी मिळू शकते. तो मुंबई इंडियन्सच्या संघाचा हिस्सा आहे.

अर्जुन तेंडुलकरला आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने 30 लाखांची बोली लावून खरेदी केले. पण त्याला अद्याप एकही आयपीएल सामना खेळण्याची संधी मिळालेली नसली तरी यावर्षी त्याला संधी मिळेल अशी अपेक्षा आहे.