टीम इंडियाला धक्क्यांवर धक्के; २२ वर्षानंतर चेन्नईत पराभव अन् गमावले जागतिक कसोटीतील अव्वल स्थान!

India vs England, 1st Test Day 5 : ऑस्ट्रेलिया दौरा गाजवल्यानंतर मायदेशात पहिलीच कसोटी मालिका खेळणाऱ्या टीम इंडियाचे 'तारे जमी पर!' आले... भारतात येण्यापूर्वी श्रीलंका दौऱ्यावर आशिया खंडातील खेळपट्टीचा अभ्यास केलेल्या इंग्लंडच्या संघानं पहिली कसोटी सहज जिंकली.

जेम्स अँडरसनच्या ( James Anderson) एका षटकानं टीम इंडियाला बॅकफूटवर पाठवले. शुबमन गिल व विराट कोहली यांची अर्धशतकी खेळी वगळता भारतासाठी काहीच चांगलं झालं नाही. इंग्लंडच्या ४२० धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला १९२ धावा करता आल्या. इंग्लंडनं हा सामना २२७ धावांनी जिंकला.

चौथ्या दिवशी रोहित शर्मा ( Rohit Sharma) माघारी परतल्यानंतर पाचव्या दिवशी टीम इंडियासमोरील आव्हान सोपं नसेल, हे साऱ्यांनाच माहित होते. सकाळच्या सत्रात जॅक लिच ( Jack Leach) नं गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीचा फायदा उचलला आणि चेतेश्वर पुजाराला ( Cheteshwar Pujara) माघारी पाठवले.

पण, शुबमन गिल ( Shubman Gill) आक्रमक पवित्र्यातच होता. त्यानं ८३ चेंडूंत ७ चौकार व १ षटकार खेचून ५० धावा केल्या. कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) एका बाजूनं खेळपट्टीवर चिटकून होता. विराटला बाद करण्यासाठी इंग्लंडचा कर्णधार जो रुटनं ( Joe Root) चेंडू ३८ वर्षीय जेम्स अँडरसनच्या हाती सोपवला अन् सामन्याला कलाटणी मिळाली. २७ व्या षटकात अँडरसननं शुबमन गिल व अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) यांचा त्रिफळा उडवला.

वॉशिंग्टन सुंदर ( ०) डॉम बेसच्या गोलंदाजीवर माघारी परतल्यानंतर विराटनं आर अश्विनला सोबत घेत अर्धशतकी भागीदारी केली. पण, अश्विनला ( ९) जॅक लिचनं बाद केलं. टीम इंडियाचा पराभव अटळ होताच, परंतु विराट खेळपट्टीवर असल्यानं आशा कायम होत्या.

बेन स्टोक्सनं भारतीयांच्या उरलेल्या आशाही मावळून टाकल्या. खेळपट्टीवर चेंडू अनपेक्षित उसळी घेत होता, तर कधी खालीच राहत होता. अशाच एका खाली राहिलेल्या चेंडूवर बेन स्टोक्सन कर्णधार विराटचा त्रिफळा उडवला. विराटनं १०४ चेंडूंत ९ चौकारांसह ७२ धावा केल्या. ३७ डावानंतर विराट कसोटीत प्रथम त्रिफळाचीत झाला. जॅक लिचनं सर्वाधिक ४ विकेट्स, तर जेम्स अँडरसननं ३ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी टीम इंडियाचे शेपूट सहज गुंडाळले आणि विजयासह मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. १९९९नंतर चेन्नईत टीम इंडिया प्रथमच कसोटी सामना हरली. इंग्लंडनं टीम इंडियाची घरच्या मैदानावरील ८ सामन्यांची विजयी मालिका खंडीत केली.

भारताची घरच्या मैदानावरील १४ सामन्यांची अपराजित मालिकाही आजच्या सामन्यामुळे खंडीत झाली. इंग्लंडचा हा भारतातील धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी २००६मध्ये मुंबईत त्यांनी २१२ धावांनी विजय मिळवला होता.

कर्णधार म्हणून जो रूटनं सर्वाधिक २६ विजय मिळवण्याच्या मायकेल वॉनच्या विक्रमाशी बरोबरी केली.

या विजयासह इंग्लंडनं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत ( ICC World Test Championship ) अव्वल स्थान पटकावले. टीम इंडियाची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे.