अजिंक्य रहाणेची 'कसोटी'! भारताकडून १०० सामने खेळण्याचे स्वप्न स्वप्नच राहणार?

ajinkya rahane test: मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणे सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे.

कधीकाळी भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज म्हणून प्रसिद्धीच्या शिखरावर असलेला मराठमोळा अजिंक्य रहाणे आताच्या घडीला देशांतर्गत क्रिकेटमध्ये देखील संघर्ष करत आहे. टीम इंडियातून बाहेर पडल्यानंतर रणजी ट्रॉफीच्या स्पर्धेतील मुंबईच्या संघातूनही बाहेर होण्याची टांगती तलवार रहाणेवर आहे. कारण मागील दहा डावांमध्ये अजिंक्यला साजेशीही खेळी करता आली नाही.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रहाणेला भारतीय संघात स्थान मिळाले होते. त्यानंतर त्याने एक द्विपक्षीय मालिका खेळली पण त्याचा फ्लॉप शो कायम राहिला.

अजिंक्य रहाणेने आपल्या टिकाऊ फलंदाजीच्या जोरावर भारताला अनेक सामने जिंकून दिले आणि अनेक सामन्यात भारताला पराभवापासून वाचवले आहे. फलंदाजीत चिवट असलेला रहाणे कालांतराने टेस्ट स्पेशलिस्ट म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यामुळे त्याच्याकडे भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते.

२०२०-२१ मध्ये जेव्हा भारताने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला तेव्हा विराट कोहली पहिला कसोटी सामना खेळून मायदेशी परतला. अशा परिस्थितीत रहाणेने संघाचे नेतृत्व करत संघाला मालिकेत विजय मिळवून दिला.

अशा परिस्थितीत रहाणेने संघाचे नेतृत्व करत संघाला मालिकेत विजय मिळवून दिला. मात्र आता रहाणे संघाबाहेर आहे. मागील वर्षी वेस्ट इंडिज दौऱ्यावर तो संघात होता पण त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले होते. आताच्या घडीला रहाणेचा फॉर्म पाहता त्याचे टीम इंडियात पुनरागमन कठीण आहे.

रहाणेचा सध्याचा फॉर्म पाहता रहाणे मुंबई संघातूनही बाहेर जाईल असे दिसते. तो सध्या रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईच्या संघाचा कर्णधार आहे. पण त्याची बॅट शांत आहे. मागील काही डावांमध्ये त्याला चांगल्या धावा करता आल्या नाहीत. त्यामुळे मुंबई संघातही टिकून राहणे त्याच्यासाठी कठीण आहे.

मुंबईच्या दहाव्या क्रमांकाच्या फलंदाजाने या हंगामात रहाणेपेक्षा एका डावात जास्त धावा केल्या. संपूर्ण हंगामात रहाणेने केलेल्या धावांपेक्षा तुषार देशपांडेने एका सामन्यात जास्त धावा केल्या आहेत. मुंबईचा १०व्या क्रमांकाचा फलंदाज तुषार देशपांडेने रणजी ट्रॉफी उपांत्यपूर्व फेरीत बडोद्याविरुद्ध १२३ धावा केल्या.

अजिंक्य रहाणेने संपूर्ण मोसमात १२३ देखील धावा केल्या नाहीत. रहाणेने या हंगामात एकूण १० डावांमध्ये ०, ०, १६, ८, ९, १, ५६*, २२, ३ आणि ० धावा केल्या.

जर आपण रहाणेच्या एकूण धावसंख्येवर नजर टाकली तर, रहाणेने संपूर्ण हंगामात केवळ ११५ धावा केल्या आहेत. तुषार देशपांडे एकाच सामन्यात रहाणेच्या पुढे गेला. अजिंक्य रहाणेने आतापर्यंत भारतासाठी ८५ कसोटी सामने खेळले असून १४४ डावांमध्ये १२ शतकांसह ५०७७ धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याचे १०० कसोटी सामने खेळण्याचे स्वप्न स्वप्नच राहण्याची शक्यता आहे.

रहाणेचा खराब फॉर्म हा चिंतेचा विषय आहे. तो मुंबईच्या संघाचा कर्णधार असल्यामुळे कदाचित त्याचे संघातील स्थान कायम आहे. मात्र रहाणेचा फॉर्म असाच कायम राहिल्यास त्याला टीम इंडियात पुनरागमन करणे अशक्य होईल आणि त्याला मुंबई संघातूनही वगळले जाऊ शकते.