"हा पुतळा फक्त माझा नाही...", सचिन तेंडुलकर भावूक; सर्व 'नॉन-स्ट्रायकर'चे मानले आभार

sachin tendulkar statue : बुधवारी सचिनच्या या २२ फुटी पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

क्रिकेटचा बादशाह, भारतरत्न, मास्टर ब्लास्टर आणि स्ट्रेट ड्राईव्हची ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरच्या आठवणी जपत अन् त्याचे अनुकरण करत भारतातील तरूण क्रिकेटचे धडे घेत असतात. याच 'क्रिकेटच्या देवा'चा सन्मान म्हणून भारतीय क्रिकेटचे घर असलेल्या वानखेडे स्टेडियमवर सचिनचा पुतळा बसवण्यात आला आहे.

बुधवारी दिग्गजांच्या उपस्थितीत हा अनावरण सोहळा पार पडला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंंदे यांसह शरद पवार आणि बीसीसीआयचे सर्व अधिकारी उपस्थित होते. वानखेडे स्टेडियमवर नवोदित क्रिकेटपटूंना प्रेरणा मिळावी म्हणून अन् महान रत्नाला सलाम म्हणून सचिनच्या फलंदाजीचे चित्रिकरण दाखवण्यात आले आहे.

बुधवारी सचिनच्या या २२ फुटी पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. अनावरण झाल्यानंतर जय शहा यांनी सचिनवर कौतुकाचा वर्षाव करताना 'क्रिकेटच्या देवा'चे अभिनंदन केले.

सचिनने देखील आपला जीवनक्रम थोडक्यात सांगताना क्रिकेटमय प्रवासात आलेल्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. पण, त्याने खासकरून नॉन-स्ट्रायकरवर साथ देणाऱ्या खेळाडूला दाद दिली.

सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर पोस्ट करत आठवणींना उजाळा दिला. पुतळ्याची झलक शेअर करताना त्याने म्हटले, "या फोटोला माझ्या हृदयात खूप खास स्थान आहे. नॉर्थ स्टँडमध्ये डोकावून गेलेल्या १० वर्षाच्या मुलापासून ते वानखेडेवर माझ्या पुतळ्याचे अनावरण होण्यापर्यंतचा प्रवास अविस्मरणीय आहे. मला आजही माझ्या तेव्हाच्या ग्रुपचा मंत्रोच्चार आणि पाठिंबा आठवतो."

तसेच मी पहिल्यांदा वानखेडेवर एक चाहता म्हणून पाऊल ठेवले, त्यानंतर ८७ च्या विश्वचषकात बॉल बॉय म्हणून गेलो. २०११ चा विश्वचषक जिंकला आणि माझा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना देखील इथेच खेळलो. हा न सांगता येणारा प्रवास आहे, असेही सचिनने नमूद केले.

"हा पुतळा फक्त माझा नाही. माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या प्रत्येक नॉन-स्ट्रायकरला, माझ्या क्रिकेटच्या नायकांना, प्रत्येक सहकाऱ्याला, प्रत्येक सहकाऱ्याला हा पुतळा समर्पित आहे, कारण त्यांच्याशिवाय हा प्रवास शक्यच झाला नसता", अशा शब्दांत सचिनने जुन्या आठवणींना उजाळा दिला.

दरम्यान, सचिन तेंडुलकरची ओळख असलेला विशेष फटका मारतानाच्या शैलीतील हा पूर्णाकृती पुतळा आहे. त्याच्या नावाने असलेल्या स्टँडच्या बाजूला हा पुतळा उभारण्यात आलेला असून दिग्गजांच्या उपस्थितीत याचे अनावरण करण्यात आले.

हा पुतळा चबुतऱ्यासह एकूण २२ फूट उंचीचा आहे. विजय मर्चंट सँट आणि सचिन तेंडुलकर स्टँडच्या मधोमध हा पुतळा उभारण्यात आला आहे.