IPL 2023 Auction: अवघ्या 15 वर्षांचा खेळाडू असणार IPLच्या लिलावात; कोण आहे अल्लाह मोहम्मद? जाणून घ्या

Allah Mohammad Ghazanfar: आयपीएलच्या आगामी हंगामासाठी 23 डिसेंबर रोजी कोची येथे खेळाडूंचा मिनी लिलाव पार पडणार आहे.

आयपीएल 2023साठी खेळाडूंचा मिनी लिलाव 23 डिसेंबर रोजी कोची येथे होणार आहे, ज्यासाठी 405 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या खेळाडूंमध्ये एक नाव आहे ज्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. कारण अवघ्या 15 वर्षाचा खेळाडू अल्लाह मोहम्मद गझनफर लिलावाच्या रिंगणात असणार आहे. अल्लाह मोहम्मद गझनफर हा अफगाणिस्तानचा रहिवासी असून या खेळाडूची आयपीएल लिलावासाठी निवड करण्यात आली आहे.

गझनफर हा ऑफ स्पिन गोलंदाज आहे. त्याला केवळ 3 ट्वेंटी-20 सामने खेळण्याचा अनुभव आहे. त्याने यावर्षी श्पेजिझा ट्वेंटी-20 लीगमध्ये मिस झनक नाइट्सकडून सामने खेळले आहेत. गझनफरला तीन सामन्यांत संधी मिळाली आणि या खेळाडूने 5 बळी घेतले. यामध्ये त्याची सरासरी फक्त 6.22 एवढी राहिली.

दुसऱ्या सामन्यातच गझनफरने आपली प्रतिभा सर्वांना दाखवून दिली. या फिरकीपटूने हिंदुकुश स्टार्सकडून खेळताना 4 षटकात केवळ 15 धावा देत 4 बळी घेतले. विरोधी संघ अवघ्या 104 धावांत आटोपला आणि गझनफरला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

गझनफरची जमेची बाजू म्हणजे त्याची अचूक लाईन-लेंथनुसार गोलंदाजी करण्याची शैली. गझनफर ऑफ स्पिनर असला तरी पॉवरप्लेमध्ये तो गोलंदाजी करू शकतो. त्याची सरासरी प्रति षटक 7 धावांपेक्षा कमी आहे. अलीकडेच त्याने बिग बॅश लीगसाठी देखील त्याचे नाव दिले होते परंतु त्याला कोणत्याही संघाने खरेदी केले नव्हते.

कोणताही आयपीएल संघ गझनफरला नक्कीच खरेदी करेल अशी अपेक्षा आहे. खरं तर गझनफरची बेस प्राइस फक्त 20 लाख रुपये आहे आणि अफगाणी फिरकीपटू आयपीएलमध्येही चांगली कामगिरी करताना दिसले आहेत. राशिद खान, मुजीब उर रहमान यांच्याकडे पाहता काही फ्रँचायझी गझनफरवरही बोली लावू शकतात. लक्षणीय बाब म्हणजे रविचंद्रन अश्विन हा गझनफरचा आदर्श आहे.