AB De Villiers: "मी त्याच्यासोबत चेंजरूममध्ये बिअर प्यायचो", डिव्हिलियर्सने IPLमधील आठवणींना दिला उजाळा

दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्स मिस्टर 360 म्हणून जगभर प्रसिद्ध आहे.

दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्स मिस्टर 360 म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाकडून खेळताना त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली. दक्षिण आफ्रिकेच्या या दिग्गज खेळाडूने केवळ आयपीएलमध्येच नाही तर क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.

मात्र, तो यंदाच्या आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही. त्याने 2021 मध्ये आयपीएल आणि क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. दक्षिण आफ्रिका क्रिकेट मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, त्याला विचारण्यात आले की आयपीएलमधील त्याचा सर्वोत्तम वेळ कोणता आहे. या प्रश्नावर त्याने अप्रतिम उत्तर देऊन सर्वांचे लक्ष वेधले.

डिव्हिलियर्सने क्रिकेट मॅगझिनशी बोलताना म्हटले, "माझ्यासाठी आणि इतर अनेक खेळाडूंसाठी ही खूप मोठी संधी होती. आयपीएलच्या सुरुवातीने आमचे आयुष्य बदलले. लोकांना क्रिकेटची खूप आवड आहे."

"माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मी अनेक लोकांना भेटलो. मी ग्लेन मॅकग्रासोबत घालवलेल्या वेळेचा विचार करतो. मी त्याच्यासोबत चेंजरूममध्ये बसून बिअर प्यायचो", अशा शब्दांत डिव्हिलियर्सने आयपीएलच्या आठवणींना उजाळा दिला.

खरं तर एबी डिव्हिलियर्स आणि ग्लेन मॅकग्रा हे दोघेही आयपीएलच्या पहिल्या 2 हंगामात एकाच संघात होते. पहिल्या दोन्ही हंगामात हे दिग्गज दिल्ली डेयरडेविल्सच्या संघातून खेळत होते.

ग्लेन मॅकग्रा यांच्या आयपीएलमधील खेळीमुळे अनेक युवा खेळाडूंवर प्रभाव पडला. सुरूवातीच्या हंगामात त्यांनी शानदार गोलंदाजी केली होती. 2010 च्या IPL नंतर त्यांनी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

एबी डिव्हिलियर्स 2011 मध्ये आरसीबीच्या संघाचा हिस्सा झाला. आरसीबीच्या संघातून त्याने सलग 11 हंगाम खेळले आहेत. त्याने आरसीबीसाठी 157 सामन्यात 4522 धावा केल्या आहेत. त्याची आयपीएलमध्ये एकूण 3 शतके आहेत.