एका षटकात ५५ धावा, ड्रग्जमुळे बंदी, इंग्लंडचा विश्वविजेता; मुंबई इंडियन्सचा ३४ वर्षीय खेळाडू निवृत्त

इंग्लंडचा फलंदाज अॅलेक्स हेल्सने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर २०२२ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हेल्सने इंग्लंडसाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. ज्यामध्ये इंग्लंडची टीम ट्वेंटी-२० वर्ल्ड कप चॅम्पियन बनली.

३४ वर्षांच्या हेल्सने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. वर्ल्ड कप विजेता फलंदाज म्हणून हेल्सची ओळख असली तरी त्याला ड्रग्ज घेतल्याने बंदीलाही सामोरे जावे लागले. तरीही हेल्सने हार मानली नाही आणि दमदार पुनरागमन करत इंग्लंडला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकून दिला.

हेल्सला क्रिकेटचा वारसा त्याचे वडील गॅरी ब्रॉक यांच्याकडून मिळाला. गॅरी ब्रॉक क्रिकेटपटू होते, तर दादा टेनिसपटू होता आणि त्याने इंग्लंडकडून विम्बल्डन खेळले. हेल्सने लहानपणापासूनच क्रिकेटमध्ये हात आजमावण्यास सुरुवात केली. हेल्सला प्रथम वेगवान गोलंदाज व्हायचे होते. पण नंतर तो स्फोटक फलंदाज म्हणून उदयास आला.

नॉटिंगहॅम काउंटीकडून खेळताना हेल्सने २००५ मध्ये वयाच्या १६ व्या वर्षी एका ट्वेंटी-२० स्पर्धेत एका षटकात ५५ धावा ठोकल्या. या षटकात गोलंदाजाने तीन नो बॉल टाकले. ज्यामध्ये हेल्सने आठ षटकार आणि एक चौकार लगावला. एका षटकात 55 धावा चोपणाऱ्या हेल्सने २०११ मध्ये भारताविरुद्ध इंग्लंडकडून ट्वेंटी-२०त क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

मैदानाबाहेरील वागणूक आणि काही कृत्यांमुळे तो चर्चेत राहिला. २०१७ मध्ये, वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यानंतर हेल्सचे त्याचा सहकारी बेन स्टोक्ससोबत भांडण झाले होते. ज्यासाठी त्याला पुढील सामन्यातून वगळण्यात आले. त्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने हेल्सला त्याच्या कृत्याबद्दल ६ सामन्यांमधून काढून टाकले.

२०१९ सालचा वन डे वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान हेल्म्सवर बंदी घातलेली औषधे घेतल्याचा आरोप होता. त्यामुळे त्याचे नाव इंग्लंडच्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या संभाव्य संघातून वगळण्यात आले. त्यावेळी इंग्लंडचा कर्णधार असलेल्या इयॉन मॉर्गनने हेल्सला संघात घेण्यास नकार दिला होता. २०२२ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून संघात पुनरागमन केले आणि इंग्लंडला विश्वविजेते बनवले.

हेल्सने त्याने ११ कसोटी सामन्यांत ५७३ धावा, ७० वन डे सामन्यांत २४१९ धावा आणि ७५ ट्वेंटी-२० सामन्यांत २०७४ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर ७ शतकं व ३१ अर्धशतकं आहेत.

हेल्सने चार वर्षांपूर्वी इंग्लंडकडून शेवटचा वन डे सामना खेळला होता आणि भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत त्याचा संघात समावेश होण्याची शक्यता कमीच आहे. पण, पुढच्या वर्षी कॅरेबियन व अमेरिका येथे होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघातील तो प्रबळ दावेदार होता. मात्र, त्याच्या निवृत्तीमुळे विल जॅक्स व फिल सॉल्ट या युवा खेळाडूंसाठी ट्वेंटी-२० संघातील संधी निर्माण झाली आहे.