ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत १० मोठे विक्रम तुटणार; रोहित शर्मा, जोस बटलर, डेव्हिड वॉर्नर पराक्रम करणार

10 records to be broken at the T20 World Cup : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचा महासंग्राम रविवारपासून सुरू होतोय... भारतीय संघ पुन्हा एकदा जेतेपदाच्या शर्यतीत आहे आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली १५ वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज आहे. पण, ही वर्ल्ड कप स्पर्धा अनेक नवे विक्रमांची नोंद करणारी ठरणार आहे. त्यात रोहित शर्मा, जोस बटलर, डेव्हिड वॉर्नर व शाकिब अल हसन यांना विक्रम खुणावत आहेत, तर विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याची शक्यता आहे.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक १०१६ ( ३१ सामने) धावांचा विक्रम श्रीलंकेच्या माहेला जयवर्धनेच्या नावावर आहे. ख्रिस गेल ९६५ ( ३३ सामने) व तिलकरत्न दिलशान ८९७ ( ३५) हे टॉप थ्री फलंदाज आहेत. पण, रोहित ८४७ धावांसह तिसऱ्या, विराट ८४५ धावांसह चौथ्या व वॉर्नर ७६२ धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे. या तिघांना या क्रमवारीत आगेकूच करण्याची संधी आहे.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत फक्त ८ फलंदाजांना शतक झळकावता आले आहे, फक्त ख्रिस गेलच्या नावावर दोन शतकं आहेत. मागच्या वर्ल्ड कप स्पर्धेत जोस बटलरने शतक झळकावले होते, तर २०१४ मध्ये अॅलेक्स हेल्सने शतकी खेळी केली होती. बटलर व हेल्स यांना या विक्रमात गेलची बरोबरी करण्याची संधी आहे.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक १० वेळा ५०+ धावा करण्याचा विक्रम भारताच्या विराट कोहलीच्या नावावर आहे. २१ सामन्यांत त्याने हा विक्रम केला आहे. ख्रिस गेल ( ९) व रोहित शर्मा ( ८) हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत आणि रोहित हा विक्रम मोडू शकतो.

वर्ल्ड कप स्पर्धेच्या एका पर्वात सर्वाधिक धावांचा विक्रमही विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने २०१४ मध्ये ६ सामन्यांत ३१९ धावा केल्या होत्या आणि तिलकरत्ने दिलशानचा ३१७ ( २००९) धावांचा विक्रम मोडला होता.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक ४१ विकेट्स बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन याच्या नावावर आहेत. आर अशिवनने यंदाच्या स्पर्धेत चमत्कार केल्यास हा विक्रम तो नावावर करू शकतो.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत केवळ दोन गोलंदाजांना एका डावात ३ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स सर्वाधिक ३ वेळा घेता आल्या आहेत. पाकिस्तानचा सईद अजमल व शाकिब अल हसन ही ती दोन गोलंदाज आहेत.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या एका पर्वात सर्वाधिक १६ विकेट्सचा विक्रम श्रीलंकेच्या वनिंदू हसरंगाने मागच्या पर्वात नोंदवला होता. त्याने श्रीलंकेच्याच अजंथा मेंडिसचा १६ ( २०१२) विकेट्सचा विक्रम मोडला होता.

दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्स याच्या नावावर ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक २३ कॅच घेण्याचा विक्रम आहे. मार्टिन गुप्तील, डेव्हिड वॉर्नर, रोहित शर्मा यंदा हा विक्रम मोडू शकतात.

महेंद्रसिंग धोनीने ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये यष्टिंमागे सर्वाधिक बळी टिपले आहेत. त्याने ३३ सामन्यात ३२ बळी टिपले आहेत.

वर्ल्ड कपच्या एका पर्वात एकाही यष्टिरक्षकाला १० बळी टिपता आलेले नाहीत. एबी डिव्हिलियर्स, अॅडम गिलख्रिस्ट, कामरान अकमल, कुमार संगकारा यांनी प्रत्येकी ९ बळी टिपले आहेत.