NZ vs WI: Glenn Phillips records fastest T20I century from New Zealand; NZ to 238/3, their third-highest T20I total | NZ vs WI : ग्लेन फिलिप्सनं न्यूझीलंडकडून नोंदवलं ट्वेंटी-20तील जलद शतक; विंडीज गोलंदाजांचं कंबरडं मोडलं

NZ vs WI : ग्लेन फिलिप्सनं न्यूझीलंडकडून नोंदवलं ट्वेंटी-20तील जलद शतक; विंडीज गोलंदाजांचं कंबरडं मोडलं

भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या वन डे सामन्यात अॅरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर भारतीय गोलंदाजांची पीसे काढत असताना दुसरीकडे न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात ग्लेन फिलिप्सनं ( Glenn Phillips) न्यूझीलंडकडून सर्वात जलद शतकाची नोंद केली. त्यानं विंडीज गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेताना संघाला ३ बाद २३८ धावांचा डोंगर उभा करून दिला. न्यूझीलंडची ही ट्वेंटी-20 क्रिकेटमधील तिसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. 

मार्टिन गुप्तील आणि टीम सेईफर्ट यांनी किवींना साजेशी सलामी दिली. ओशाने थॉमसनं त्यांची ४९ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. सेईफर्ट ( १८) माघारी परतल्यानंतर गुप्तीलही ( ३४) पुढच्याच षटकात फॅबीअन अॅलनच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्यानंतर फिलिप्स व डेव्हॉन कॉनवे ( Devon Conway) यांनी तुफान फटकेबाजी केली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी विक्रमी १८४ धावांची भागीदारी केली. ट्वेंटी-20 क्रिकेटमधील ही नॉन-ओपनिंग खेळाडूंनी केलेली सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी इंग्लंडच्या डेव्हिड मलान व इयॉन मॉर्गन यांनी २०१९मध्ये न्यूझीलंडविरुद्ध १८२ धावांची भागीदारी केली होती.

न्यूझीलंडनं २० षटकांत ३ बाद २३८ धावा चोपल्या. फिलिप्सनं ५१ चेंडूंत १० चौकार व ८ षटकारांसह १०८ धावा चोपल्या. कॉनवेनं ३७ चेंडूंत ( ४ चौकार व ४ षटकार) नाबाद ६५ धावा केल्या. फिलिप्सनं ४६ चेंडूंत शतक पूर्ण केले. यापूर्वी कॉलिन मुन्रोनं २०१८मध्ये विंडीजविरुद्ध ४७ चेंडूंत शतक झळकावलं होतं. 
 
 
वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: NZ vs WI: Glenn Phillips records fastest T20I century from New Zealand; NZ to 238/3, their third-highest T20I total

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.