NZ vs IND: India have three blows in the first session, 3 for 79 in 28 overs. | NZ vs IND: पहिल्या सत्रात भारताला तीन धक्के, २८ षटकांत ३ बाद ७९

NZ vs IND: पहिल्या सत्रात भारताला तीन धक्के, २८ षटकांत ३ बाद ७९

वेलिंग्टन - न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या सत्रात भारताला तीन धक्के बसले. त्यामुळे पहिल्या डावातील २८ षटकांत भारताला उपहारापूर्वी ३ बाद ७९ अशी मजल मारता आली.

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली आणि भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. न्यूझीलंडचा हा निर्णय योग्य असल्याचे पहिल्या सत्रात दिसले. कारण न्यूझीलंडने पहिल्या सत्रात भारताच्या तीन फलंदाजांना बाद केले.

भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉ हा आक्रमक फलंदाजी करत होता, पण त्याला टीम साऊथीने त्रिफळाचीत करत भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर कायले जेमिनसनने चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली यांना बाद करत भारताला बॅकफूटवर ढकलले. पण त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि सलामीवीर मयांक अगरवाल यांनी दमदार फलंदाजी करत भारताची पडझड थांबवली आणि उपहारापर्यंत संघाला ३ बाद ७९ अशी मजल मारून दिली.

सामना सुरु होण्यापर्वीच भारताला मोठा धक्का, घडली ही गोष्ट
न्यूझीलंडविरुद्धची पहिला कसोटी सामना सुरु होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. या गोष्टीचा परीणाम सामन्याच्या निकालावर होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये आतापर्यंत बरेच सामने झाले आहेत. भारताने आतापर्यंत न्यूझीलंडचे बरेच दौरे केले आहेत. हे दौरे बऱ्याचदा भारतीय संघासाठी खडतर ठरलेले आहेत. त्यामुळेच गेल्या ५१ वर्षांमध्ये भारताला या मैदानात एकही सामना जिंकता आलेला नाही. भारताने या मैदानात १९६८ साली कसोटी मालिका सामना जिंकता आला होता. पण त्यानंतर गेल्या ५१ वर्षात भारतीय संघाला हे मैदान अनलकी ठरले आहे.

वेलिंग्टनच्या मैदानात भारताने १९६८ साली न्यूझीलंडला पराभूत केले होते. त्यानंतर या मैदानात भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये १९७६ साली कसोटी सामना झाला होता. या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर १९८१ साली या दोन्ही संघांमध्ये कसोटी सामना रंगला होता. पण यावेळी भारताच्या पदरी पराभव पडला होता.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये १९९८ सालीही कसोटी सामना खेळवला गेला होता. या सामन्यातही भारताला पराभूत व्हावे लागले होते. या दोन्ही देशांमध्ये वेलिंग्टनच्या मैदानात २००२ साली कसोटी सामना झाला होता. त्यावेळीही भारताच्या पदरी निराशा पडली होती. २००९ साली या दोन्ही देशांमध्ये कसोटी सामना झाला होता. त्यावेळी मात्र भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामना अनिर्णीत राहिला होता. त्यामुळे १९६८नंतर भारताला या मैदानात एकही सामना जिंकता आलेला नाही.

या सामन्यापूर्वी भारताचे नशिब चांगले नसल्याचे पाहायला मिळाले. कारण या सामन्याच्या नाणेफेकीचा निकाल न्यूझीलंडच्या बाजूने लागला. आतापर्यंतचा इतिहास पाहता न्यूझीलंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हा सामना भारताच्या हातून निसटू शकतो, असे काही जणांनी म्हटले असून भारतीय संघासाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

Web Title: NZ vs IND: India have three blows in the first session, 3 for 79 in 28 overs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.