Join us  

फाटलेल्या शूजचा फोटो पोस्ट करणे पडणार महागात; झिम्बाब्वेच्या फलंदाजाला मिळणार शिक्षा

झिम्बाब्वेचा फलंदाज रायन बर्ल ( Ryan Burl) याला पुमा PUMA कडून स्पॉन्सरशीप मिळाली. काही दिवसांपूर्वी बर्लनं सोशल मीडियावर त्याच्या फाटलेल्या शूजचा फोटो पोस्ट केला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 11:31 AM

Open in App

झिम्बाब्वेचा फलंदाज रायन बर्ल ( Ryan Burl) याला पुमा PUMA कडून स्पॉन्सरशीप मिळाली. काही दिवसांपूर्वी बर्लनं सोशल मीडियावर त्याच्या फाटलेल्या शूजचा फोटो पोस्ट केला होता. त्यानं हा फोटो पोस्ट करून राष्ट्रीय संघासाठी स्पॉन्सरशीपची मागणी केली आणि अवघ्या २४ तासांत पुमा क्रिकेटनं त्याची ही मागणी मान्य केली. पुमाकडून नवे शूज मिळणार असल्यानं क्रिकेटपटू आनंदात आहेत, परंतु बर्लचा हा प्रयत्न त्याच्याच अंगलट येणार आहे. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्ड त्याच्यावर कारवाई करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बर्लनं सोशल मीडियावर केलेलं आवाहन बोर्डाला आवडलेलं नाही. त्यामुळे बोर्डाची शिस्तपालन समिती त्याच्याविरुद्ध कारवाई करू शकतं.

पत्रकार अॅडम थीओ यांनी केलेल्या ट्विटवरून हा अंदाज व्यक्त केला जात आहे. ''झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाचे सदस्य या कृतीमुळे रागावले आहेत. त्याचे हे आवाहन म्हणजे संघटनेची प्रतीमा मलिन करण्यासारखे आहे. त्यामुळे बोर्डातील सदस्य त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. असे झाल्यास झिम्बाब्वे बोर्डाची ही मोठी चूक असेल.'' बर्ल यानं झिम्बाब्वेकडून तीन कसोटी, १५ वन डे व २५ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत आणि त्यात त्यानं ६६० धावा व १८ विकेट्स घेतल्या आहेत.  

नेमकं काय आहे प्रकरण?रायन बर्ल यानं त्याच्या फाटलेल्या शूजचा फोटो ट्विट करुन मदतीचं आवाहन केलं होतं. याची दखल प्रसिद्ध स्पोर्ट्सब्रँड 'पूमा' कंपनीनं घेतली आणि मदतीची घोषणा केली होती. बर्ल यानं त्याच्या ट्विटमध्ये कुणीतरी आम्हाला मदत केली तर खूप बरं होईल आणि गम चिकटवून शूज वापरण्याची वेळ आमच्यावर येणार नाही, असं म्हटलं होतं. याची पूमा कंपनीनं तातडीनं दखल घेतली आणि मदतीसाठी धाव घेतली आहे. "फाटलेल्या शूजला चिकटवण्याची वेळ आता संपलीय", असं ट्विट करुन 'पूमा' कंपनीनं झिम्बाब्वेच्या खेळाडूंना क्रिकेट कीटची मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.  'पूमा' कंपनीच्या पुढाकाराबद्दल बर्ल यानंही कंपनीचे आभार व्यक्त केले आहेत. "मला सांगताना अतिशय आनंद होतोय की पूमा कंपनीनं मदत करण्याची तयारी दाखवली आहे आणि या कंपनीसोबत आता जोडलो गेलोय", असं बर्ल यानं म्हटलं आहे.  

टॅग्स :झिम्बाब्वे