मुंबई : भारताचा यशस्वी वेगवान गोलंदाज झहीर खान आणि आर. पी. सिंग यांनी २१ नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या दुसऱ्या टी१० लीग साठी करार केला आहे.
झहीर आणि आर.पी. यांच्याप्रमाणेच प्रवीण कुमार, एस.बद्रीनाथ, रितींदरसिंह सोढी हे देखील या लीगमध्ये खेळतील.
विश्वचषक २०११ विजेता भारतीय संघाचा सदस्य असलेल्या झहीर याने सर्व प्रारूपात ६०० पेक्षा जास्त बळी घेतले आहेत. गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला आर.पी. सिंग हा दक्षिण आफ्रिकेत झालेल्या २००७ च्या टी२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा सदस्य होता. बद्रीनाथ याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
वीरेंद्र सेहवाग व शाहिद आफ्रिदी यांना या लीगसाठी आयकॉन म्हणून निवडले गेले आहे. पाकिस्तानचा माजी खेळाडू वसीम अक्रम हा संचालक असून आठ संघांदरम्यान २१ नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंत सामने शारजाहमध्ये होतील.