Join us  

युवराज सिंगला 2019चा वर्ल्ड कप खेळायचा होता, पण...

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने संघ व्यवस्थापनावर निशाणा साधताना अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 11:49 AM

Open in App

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने संघ व्यवस्थापनावर निशाणा साधताना अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले. त्याला 2019चा वर्ल्ड कप खेळायचा होता, परंतु त्याचे हे स्वप्न अपूर्ण राहिले. 2011च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा खरा नायक ठरलेल्या युवीला 2015नंतर 2019च्या वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याची खंत त्याच्या मनात आहे. काही महिन्यांपूर्वी युवीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

युवराजनं टीम इंडियाच्या संघ व्यवस्थापनावर टीका केली. त्यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे युवीला निवृत्ती घ्यावी लागली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात संघ व्यवस्थापनाकडून युवीला योग्य वागणुक मिळालेली नव्हती. Yo-Yo टेस्ट पास करूनही युवीला संघात स्थान देण्यात आले नव्हते. 

जून 2017मध्ये युवराजनं टीम इंडियाकडून अखेरचा वन डे ( वि. वेस्ट इंडिज, अँटिग्वा) सामना खेळला होता. विंडीजविरुद्धच्या मालिकेत काही सामन्यात मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार जिंकूनही त्याला संघाबाहेर करण्यात आले होते. 2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफीतही तो संघाचा सदस्य होता आणि त्यानं चार सामन्यांत 35 च्या सरासरीनं व 99.06च्या स्ट्राईक रेटनं 105 धावा केल्या होत्या. भारताला त्या स्पर्धेत अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. त्याही सामन्यात युवीनं 31 चेंडूंत 22 धावा केल्या होत्या.

युवीनं 2019चा वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याच्या आशा सोडल्या नव्हत्या. पण, स्थानिक क्रिकेटमध्ये आलेले अपयश आणि इंडियन प्रीमिअर लीगमधील कामिरीमुळे त्याला संधी मिळाली नाही. तो म्हणाला,'' मला 2019 चा वर्ल्ड कप खेळायचा होता. 2015चा वर्ल्ड कप खेळण्याची संधी न मिळाल्यानं निराश होतो. त्यावेळी मी रणजी करंडक स्पर्धेत खोऱ्यानं धावा केल्या होत्या. पण, 2019च्या वर्ल्ड कप स्पर्धा लक्षात घेता माझे वय ( 37) ही सर्वात मोठी कमकुवत बाजू होती. अशा अनेक गोष्टी होत्या ज्या माझ्या पक्षात नव्हत्या. त्यामुळे आणखी एक वर्ल्ड कप खेळण्याची संधी हुकल्याचे दुःख करण्यापेक्षा अनेक वर्ष क्रिकेटची सेवा करता आली याचे समाधान मानायला हवे. योग्यवेळी निवृत्ती घेतली याचा आनंद आहे.'' 

टॅग्स :युवराज सिंगबीसीसीआयवर्ल्ड कप 2019