Join us  

...तर भारताच्या ट्वेंटी-20 संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवा, युवीचा सल्ला

इंग्लंडमध्ये पार पडलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला. या स्पर्धेनंतर भारतीय संघाच्या नेतृत्वाच्या जबाबदारीची विभागणी होईल, अशी चर्चा सुरू होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 3:58 PM

Open in App

इंग्लंडमध्ये पार पडलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला. या स्पर्धेनंतर भारतीय संघाच्या नेतृत्वाच्या जबाबदारीची विभागणी होईल, अशी चर्चा सुरू होती. मर्यादित षटकांच्या सामन्यात संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात यावा, असा अनेकांनी सल्ला दिला. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL) रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने मिळवलेल्या यशाच्या मुल्यमापनावर हा सल्ला देण्यात येत आहे. आता भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग यानेही ट्वेंटी-20 संघाचे नेतृत्व रोहितकडे सोपवा असे मत व्यक्त केले आहे.

क्रिकेटच्या तीन वेगवेगळ्या प्रकारात एकाच खेळाडूनं नेतृत्व सांभाळणे सोपं काम नाही. पण, तरीही विराट कोहलीनं तीनही फॉरमॅटमध्ये यश मिळवले आहे. पण, जर संघ व्यवस्थापनाला वाटत असेल की कोहलीवर कामाचा प्रचंड ताण आहे, तर रोहितकडे मर्यादित षटकांच्या संघाचे नेतृत्व सोपवावे, असे युवीने स्पष्ट केले. तो म्हणाला,''यापूर्वी केवळ दोनच फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळलं जायचं. त्यामुळे कर्णधाराला दोन्ही फॉरमॅटमध्ये नेतृत्व करणं तितकं कठीण जात नव्हते. आता तीन फॉरमॅट आहेत, जर कोहलीवर ताण पडत असेल तर संघ व्यवस्थापनाने दुसऱ्या कोणाकडे तरी ही जबाबदारी सोपवायला हवी. मर्यादित षटकांच्या सामन्यात रोहितने त्याचे नेतृत्व सिद्ध केले आहे.''

भारतीय संघ ट्वेंटी-20 वर्ल्ड कपच्या तयारीला लागला आहे. 2020 आणि 2021मध्ये ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहेत. एका वर्षात भारतीय संघ 2020 वर्ल्ड कप साठी कसा तयार होईल, याचा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याबाबत युवी म्हणाला,''मलाही याची कल्पना नाही. विराट कोहलीवरील कामाच्या ताणाचाही विचार व्हायला हवा. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये इतर पर्याय वापरायला हवा का? संघ व्यवस्थापन भविष्याबाबत कसा विचार करते, यानंतर याचे उत्तर मिळेल. विराट हा सर्वोत्तम फलंदाज आहे. तो कामाचा ताण कसा हाताळतो? याबाबत संघ व्यवस्थापनाने निर्णय घ्यायला हवा.''

रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएलचे चार जेतेपद पटकावली आहेत. त्यामुळे त्याच्याकडे टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघाचे नेतृत्व सोपवण्यात यावे, अशी मागणी होत आहे. 

टॅग्स :रोहित शर्मायुवराज सिंगविराट कोहली