Join us  

युवा खेळाडूंना प्रशिक्षण देणार - आर. पी. सिंग; क्रिकेटच्या सर्वप्रकारातून जाहीर केली निवृत्ती

क्रिकेटमधून निवृत्ती घोषित करणारा उत्तर प्रदेशचा आंतरराष्ट्रीय वेगवान गोलंदाज आरपी सिंग याने आपण युवा खेळाडूंना प्रशिक्षण देणार असल्याचे सांगितले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2018 3:06 AM

Open in App

लखनऊ : क्रिकेटमधून निवृत्ती घोषित करणारा उत्तर प्रदेशचा आंतरराष्ट्रीय वेगवान गोलंदाज आरपी सिंग याने आपण युवा खेळाडूंना प्रशिक्षण देणार असल्याचे सांगितले. लखनऊमधील गोमतीनगर येथे राहाणाऱ्या आरपी सिंगने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने टिष्ट्वटरवर आपल्या भारतीय संघातील पदार्पणाची आठवण शेअर केली. त्यात त्याने म्हटले की, ‘१३ वर्षांपूर्वी म्हणजे, ४ सप्टेंबर २००५ मध्ये मी पहिल्यांदा भारतीय संघाची जर्सी घातली होती. त्या आठवणी आज पुन्हा ताज्या झाल्या.’आरपी सिंगची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द ही जवळपास सहा वर्षांची राहिली. त्याने क्रिकेटच्या सर्व प्रकारांत एकूण ८२ सामने खेळले. त्यात त्याने १०० बळी घेतले. तो वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाला की, ‘सध्या मी ग्रेटर नोएडामधील युवा खेळाडूंना क्रिकेटचे प्रशिक्षण देण्यासाठी क्रिकेट अकादमी चालवत आहे. मी युवा अणि नवोदित खेळाडूंना प्रशिक्षण देत असून त्यांनी क्रिकेटमध्ये राज्य आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे हीच माझी इच्छा आहे. सध्या मी क्रिकेट समालोचक व प्रशिक्षण यावर लक्ष देत आहे. मात्र, त्याआधी काही दिवस आराम करणार असून त्यानंतर पुढील योजनांचा विचार करेल.’उत्तर प्रदेशचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने गेल्या निवडणुकीत इलाहाबादकडून कॉँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. याबाबत आरपीला विचारले असता, ‘सध्या राजकारणाबाबत विचार केलेला नाही,’ असे त्याने सांगितले.

टॅग्स :क्रिकेट