अयाझ मेमन
संपादकीय सल्लागार
यंदाचा आॅल स्टार आयपीएल संघ निवडणे नक्कीच सोपे ठरले नाही. यंदाचे सत्र जबरदस्त रोमांचक होते व अनेक सामने अखेरच्या क्षणांपर्यंत रंगले होते. त्याचबरोबर अनेक लक्षवेधी वैयक्तिक कामगिरीने यंदाचे सत्र गाजले. मी अशा खेळाडूंची निवड केली आहे, ज्यांच्यामध्ये सामना एकहाती जिंकून देण्याची क्षमता आहे. पण त्याचबरोबर सांघिक कामगिरीलाही तितकेच महत्त्व दिले आहे.
निवडलेला संघ पाहून नक्कीच वाचकांना धक्का बसेल. कारण या संघामध्ये विराट कोहली, एबी डीव्हीलियर्स या दिग्गजांना स्थान मिळालेले नाही. जरी या दोन्ही खेळाडूंनी फलंदाज म्हणून यंदा छाप पाडली असली, तरी त्यांना काही कारणास्तव या संघात स्थान मिळालेले नाही. दिनेश कार्तिकला वगळून त्याच्याऐवजी दुसरा खेळाडू निवडणे माझ्यासाठी सर्वात कठीण निर्णय होता. कारण कार्तिकने यंदा पहिल्यांदाच केकेआरकडून खेळताना कर्णधार आणि फलंदाज म्हणून शानदार कामगिरी केली आहे. पण दुर्दैवाने त्याची स्पर्धा महेंद्रसिंह धोनीशी झाली व
इथेच फरक स्पष्ट झाला.
निवडलेला संघ
महेंद्रसिंह धोनी :
सीएसकेचा प्रमुख असलेला धोनी यंदाच्या आयपीएल सत्राचे मुख्य आकर्षण होता. एका वेगळ्या जोषामध्ये दिसलेल्या धोनीच्या फलंदाजीने मोठी उंची गाठली. त्याने फिनिशर म्हणूनही स्वत:ला सिद्ध केले. एकूणच तो जबरदस्त खेळाडू ठरला आणि माझ्या आयपीएल इलेव्हन संघाचा तोच कर्णधार असेल.
शेन वॉटसन :
खरं म्हणजे पहिला खेळाडू म्हणून माझी पसंती जोस बटलरला होती. पण रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात वॉटसनने ज्याप्रकारे तडाखेबंद शतक ठोकले ते शानदार होते. तो वन मॅन आर्मीप्रमाणे सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळला. त्यामुळेच वॉटसनला माझ्या संघापासून दूर ठेवणे खूप कठीण होते.
लोकेश राहुल :
यंदाच्या लीगमध्ये सर्वाधिक स्फोटक सलामीवीर म्हणून राहुलने छाप पाडली. त्याचप्रमाणे तो सर्वात स्टायलिशही ठरला. स्पर्धेच्या दुसऱ्या सत्रामध्ये त्याने एकट्याच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबच्या प्लेआॅफ गाठण्याच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. क्षेत्ररक्षक आणि यष्टिरक्षक म्हणून तो लक्षवेधी ठरला.
केन विल्यम्सन :
गेल्या सत्रात विल्यम्सनला संघात कायमचे स्थान मिळाले नव्हते. पण यंदा मात्र त्याने स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून वर्चस्व राखले. शिवाय स्ट्राइक रेटही जबरदस्त राखला. स्पर्धा सुरू होण्याच्या काहीदिवस आधी डेव्हिड वॉर्नरवर बंदी आल्यानंतर विल्यम्सनने शानदार नेतृत्व करीत संघाला अंतिम फेरीतही नेले.
अंबाती रायुडू :
आक्रमक आणि आकर्षक फटकेबाजी करणारा फलंदाज. यंदाच्या सत्रात सातत्याने धावा करीत त्याने भारतीय राष्ट्रीय निवडकर्त्यांचे लक्ष वेधले. सलामीवीर म्हणून त्याने खोºयाने धावा काढल्या, पण तो कुठल्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो.
टेÑंट बोल्ट :
संघात स्थान देण्यासाठी बोल्ट व अँड्रयू टाय यांच्यामध्ये टॉस करावा लागला. पण मी बोल्टला पसंती दिली, कारण त्याची डावखुरी शैलीदार स्विंग व भेदक गोलंदाजी संघाला खूप आक्रमक बनवते. त्याचबरोबर सीमारेषेजवळ बोल्ट एक उत्तम क्षेत्ररक्षकही आहे.
ऋषभ पंत :
यंदाचा सत्रात सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू म्हणून सहजपणे ऋषभने लक्ष वेधले. ताकदवान षटकार ठोकण्याच्या क्षमतेने त्याने सर्वांनाच आपली दखल घेण्यास भाग पाडले. त्याने नक्कीच निवडकर्त्यांची पसंती मिळवली असून त्याला आता भारतीय संघात स्थान मिळायला पाहिजे.
हार्दिक पंड्या :
आपल्याला इतके महत्त्व का आहे, हे हार्दिकने आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीने, तसेच क्षेत्ररक्षणाने दाखवून दिले. त्याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावरच मुंबई इंडियन्सने अखेरच्या क्षणापर्यंत स्वत:ला प्लेआॅफच्या दिशेने कायम ठेवले होते.
जसप्रीत बुमराह :
यंदाच्या सत्रात सर्वाधिक बळी घेणाºया अव्वल ५ गोलंदाजांमध्ये बुमराहचा समावेश नाही. पण तरी त्याने १७ बळी घेतले असून राशिद खाननंतर १० हून अधिक सामने खेळलेल्यांपैकी त्याचा इकॉनॉमी रेट सर्वात चांगला आहे. डेथ ओव्हर्समध्ये बुमराह सर्वोत्तम गोलंदाज आहे.
राशिद खान : राशिद जगातील अव्वल टी-२० फिरकी गोलंदाज असल्याचे निर्विवाद सत्य आहे. त्याच्या जबरदस्त नियंत्रणापुढे कसलेल्या फलंदाजांनाही घाम फुटतो. शिवाय त्याने फलंदाज आणि जबरदस्त क्षेत्ररक्षक म्हणूनही लक्ष वेधले आहे.
कुलदीप यादव : यंदाच्या लीगमधील पहिल्या सत्रात कुलदीप फारसा यशस्वी ठरला नाही, पण दुसºया सत्रात त्याने आपला जलवा दाखवला. त्याने आघाडीच्या फळीला आपली गोलंदाजी समजून घेण्यासाठी प्रचंड दबावाखाली आणत त्यांना जखडवून ठेवले.
सुनील नरेन (१२ वा खेळाडू)
नरेनला आपल्या गोलंदाजी शैलीमध्ये सुधारणा करण्यास भाग पाडल्यानंतर त्याच्या गोलंदाजीतील जादू किंवा रहस्य लुप्त झाले आहे. पण तरीही तो फलंदाजांवर दबाव आणतो. तसेच आघाडीच्या फळीतील तो धोकादायक फलंदाज असून लय मिळाल्यास तो कोणत्याही गोलंदाजाच्या चिंधड्या उडवतो.