बंगळुरू : भारतीय क्रिकेटमधील सर्वोच्च असलेल्या रणजी करंडक स्पर्धेच्या नव्या मोसमाला बुधवारपासून सुरुवात होत असून, युवा क्रिकेटपटू आपली छाप पाडण्यास सज्ज झाले आहेत. त्याच वेळी इंग्लंड दौऱ्यात दुखापतग्रस्त झाल्यानंतर क्रिकेटपासून दूर राहिलेला ऋषभ पंत या स्पर्धेद्वारे पुनरागमन करू शकतो.
पंतचा दिल्लीकडून दुसऱ्या फेरीत खेळण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघाला फार काळ कसोटी सामने खेळायचे नाहीत. जुलै महिन्यात मँचेस्टरमध्ये ख्रिस वोक्सच्या चेंडूवर पायाच्या बोटाला झालेल्या फ्रॅक्चरनंतर पंत क्रिकेटपासून दूर आहे.
हैदराबादविरुद्ध होणाऱ्या पहिल्या फेरीसाठी दिल्लीच्या २४ सदस्यीय संघात पंतचा समावेश नाही. परंतु, सीओईकडून मंजुरी मिळाल्यास तो दुसऱ्या फेरीत (२५ ऑक्टोबरपासून हिमाचल प्रदेशविरुद्ध) किंवा तिसऱ्या फेरीत (१ नोव्हेंबरपासून पुदुच्चेरीविरुद्ध) खेळताना दिसू शकतो. यामुळे पंतला १४ नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू होणाऱ्या मालिकेपूर्वी तंदुरुस्ती तपासण्याची आणि सराव करण्याची संधी मिळू शकते.
पंतच्या व्यतिरिक्त, अनेक खेळाडूंना रणजी करंडकातील कामगिरीच्या आधारे भारतीय संघात संधी मिळेल, अशी फारशी अपेक्षा नाही. कारण, या मोसमात भारताला मर्यादित षटकांच्या मालिकाच जास्त खेळायच्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेचे महत्त्व आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेचे गुण लक्षात घेता, वेस्ट इंडिजविरुद्ध प्रभावी कामगिरी करणाऱ्या १५ खेळाडूंमध्ये फारसे बदल होतील असे दिसत नाही.
विदर्भाचा जेतेपद राखण्याचा निर्धार
४२ वेळा रणजी विजेतेपद पटकावलेला मुंबई संघ पुन्हा एकदा संभाव्य विजेता मानला जात आहे. मात्र, गतविजेते विदर्भ आपले विजेतेपद सहजासहजी सोडणार नाही. त्याचप्रमाणे, केरळ, सौराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू आणि कर्नाटक हे संघही आपला गौरव पुन्हा मिळवण्यासाठी सर्वोत्तम खेळ करतील.