Join us  

यो-यो मध्ये फेल झाल्याने युवी, रैनाला भारतीय संघात मिळाले नाही स्थान

श्रीलंकेत होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी युवराज सिंग आणि सुरेश रैना या डावखुऱ्या फलंदाजांना संघात स्थान मिळालेले नाही. मात्र फलंदाजीतील कामगिरी नव्हे तर खराब फिटनेसमुळे त्यांना संघातून  वगळण्यात आल्याचे समोर आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2017 10:47 PM

Open in App

नवी दिल्ली, दि. 16  - श्रीलंकेत होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी युवराज सिंग आणि सुरेश रैना या डावखुऱ्या फलंदाजांना संघात स्थान मिळालेले नाही. मात्र फलंदाजीतील कामगिरी नव्हे तर खराब फिटनेसमुळे त्यांना संघातून  वगळण्यात आल्याचे समोर आले आहे.  बंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अॅकॅडमीमध्ये (एनसीए) यो-यो नावाच्या फिटनेस चाचणीत नापास झाल्याने या दोघांनाही संघात स्थान मिळालेले नाही. भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना नियमितपणे विविध प्रकारच्या तंदुरुस्तीच्या चाचण्यांना सामोरे जावे लागते. त्यामध्ये यो-यो ही तंदुरुस्ती चाचणी महत्त्वाची आहे.  याआधीचे क्रिकेटपटू ज्या तंदुरुस्ती चाचण्यांमधून जात असत त्यापेक्षा ही चाचणी अधिक अद्ययावत आहे.  सध्याचा भारतीय क्रिकेट संघ बऱ्यापैकी तंदुरुस्त मानला जातो. या संघासाठी यो-यो चाचणीमध्ये सरासरी 19.5 किंवा त्याहून अधिक गुण मिळवणे अनिवार्य ठरवण्यात आले आहे. या चाचणीनुसार भारताचा कर्णधार विराट कोहली हा सर्वात तंदुरुस्त क्रिकेटपटू आहे. त्याची  यो-यो चाचणीमधील गुणसंख्या 21 हून अधिक भरते. मात्र युवराज आणि रैनाला या चाचणीत 19.5 हून खूप कमी मिळाले. या चाचणीत युवीला केवळ 16 गुणची मिळवता आले. त्यामुळे त्याला  संघाबाहेर राहावे लागले.  सध्याच्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, प्रशिक्षक रवी शास्त्री आणि निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी तंदुरुस्तीच्या बाबतीत कोणतीही हयगय न करण्याचे धोरण आखले आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूसुद्धा अशा यो-यो चाचणीला सामोरे जातात. त्यांची सरासरी गुणसंख्या 21 एवढी भरते. भारतीय संघामध्ये विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि मनीष पांडे यो-यो चाचणीत सातत्याने 21 हून अधिक गुण मिळवतात. तर बाकीचे खेळाडू 19.5 किंवा त्याहून अधिक गुण मिळवतात, असे बीसीसीआयमधील एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.   तरच भारतीय संघात संघात प्रवेश - शास्त्रीआगामी विश्वकप स्पर्धेसाठी संघ नियोजनाची सुरुवात केली आहे. ज्यावेळी  विश्वचषकाचा विचार करतो तेव्हा माझं स्पष्ट मत असतं की, जो संघ विश्वचषकात खेळेल त्यामधील खेळाडू हे पूर्णपणे फिट असतील आणि फिल्डींगच्या बाबतीत श्रेष्ठ असतील. ते आपला फिटनेस कायम ठेवतील त्यांनाच पुढे संधी देण्यात येईल असे मत भारतीय संघाचे कोच रवी शास्त्री यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं आहे. टीम इंडियाने अपेक्षित विराट कामगिरी करताना श्रीलंकेला त्यांच्याच भूमीमध्ये लोळवले. विशेष म्हणजे 3 कसोटी सामन्यांची मालिका 3-0 अशी निर्विवादपणे जिंकून भारतीय संघाने परदेशात पहिल्यांदाच क्लीनस्वीप नोंदवला. यावर ते म्हणाले की, संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. भविष्यातही हे खेळाडू आपली कामगिरी चोख बजावतील. पुढे बोलताना ते म्हणाले की, भविष्यात आपल्याला टेस्ट क्रिकेट खूप खेळायचे आहेत. टेस्ट क्रिकेटबरोबरच विश्वचषकावरही लक्ष द्यायला हवं. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि द. आफ्रिका सारखे संघ विश्वचषक आणि कसोटीसाठी विशेष प्लॅन तयार करत असतात.  रवी शास्त्री यांच्या या भूमिकेमुळे संघातील दिग्गज खेळाडूंना आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रीत करावं लागणार आहे.