Join us

होय मी फिक्सिंग केले, माझी चूक झाली, मला माफ करा!

पाकिस्तानी क्रिकेटपटू दानिश कानेरियाची सहा वर्षांनंतर कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 06:15 IST

Open in App

कराची : गेली सहा वर्षे निकालनिश्चितीचे आरोप फेटाळणाऱ्या पाकिस्तानच्या माजी गोलंदाज दानिश कानेरियाला सहा वर्षांनंतर उपरती सुचली. त्याने इंग्लंडमधील एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत फिक्सिंग केल्याची कबुली दिली. या प्रकरणामुळे इंग्लिश कौंटी क्रिकेटच्या एसेक्स क्लबमधील त्याचा सहकारी मर्विन वेस्टफिल्डला कारागृहातही जावे लागले होते.

कानेरियावर इंग्लिश क्रिकेटने आजीवन बंदी घातली असून ही जगभरात लागू होते. एका वृत्तवाहिनीच्या डॉक्युमेंटरीमध्ये कानेरियाने सांगितले की, ‘माझे नाव दानिश कानेरिया आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने माझ्यावर २०१२ मध्ये फिक्सिंगचे दोन आरोप केले होते. ते आरोप मी मान्य करतो.’ या कृत्याचा पश्चात्ताप होत असल्याचे सांगून आपल्यावर घातलेली आजीवन बंदी उठविण्यात यावी, अशी विनंतीही त्याने केली आहे. कानेरिया म्हणाला, ‘मर्विन आणि एसेक्स संघातील सहकारी, एसेक्स क्रिकेट क्लब, एसेक्सचे चाहते आणि पाकिस्तानातील चाहत्यांची मी माफी मागतो. मी एका सट्टेबाजासह संपर्क ठेवून याची माहिती अधिकाºयांना दिली नाही आणि याची शिक्षा मी भोगली आहे.’

मर्विनने २००९ साली डरहम येथे ४० षटकांच्या कौंटी सामन्यात पहिल्या षटकात १२ धावा देण्याच्या बदल्यात कथित सट्टेबाज अनू भट्ट याच्याकडून ७,८६२ डॉलर घेतले होते. हा प्रकार कानेरियाच्या मध्यस्थीने झाला होता. त्यानेच मर्विन आणि भट्ट यांची भेट घडवून आणली होती.