यशस्वी, सरफराझने दाखवली 'खडूस' वृत्ती: शार्दुल ठाकूर; सध्या रणजी चषक सामन्यावर लक्ष

भारताचा स्टार अष्टपैलू शार्दुल ठाकूरने 'लोकमत'शी संवाद साधला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2024 11:08 PM2024-02-20T23:08:46+5:302024-02-20T23:11:21+5:30

whatsapp join usJoin us
yashasvi jaiswal and sarfaraz shows khadoos attitude said shardul thakur while interact with lokmat | यशस्वी, सरफराझने दाखवली 'खडूस' वृत्ती: शार्दुल ठाकूर; सध्या रणजी चषक सामन्यावर लक्ष

यशस्वी, सरफराझने दाखवली 'खडूस' वृत्ती: शार्दुल ठाकूर; सध्या रणजी चषक सामन्यावर लक्ष

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

रोहित नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : 'सरफराझ खानने कसोटी पदार्पणात धमाका केला. यशस्वी जैस्वालनेही शानदार खेळी केली. दोघेही नेहमीच बिनधास्तपणे खेळतात. सरफराझ-यशस्वी यांनी मुंबईतील मैदानात सातत्याने खेळून आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबईकर क्रिकेटपटूंची खडूस वृत्ती दाखवून दिली,' असे भारताचा स्टार अष्टपैलू शार्दुल ठाकूरने 'लोकमत'शी संवाद साधताना सांगितले.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत चमकलेल्या सरफराझ-यशस्वी यांच्याविषयी शार्दुलने म्हटले की, 'सरफराझने तीन वर्षांपासून भारतीय संघासाठी प्रतीक्षा केली आणि संधी मिळाल्यानंतर त्याने स्वत:ला सिद्ध केले. यशस्वीनेही प्रभावी कामगिरी केली. दोघांच्या पाठिशी कोणीही गॉडफादर नव्हते. सरफराझला त्याच्या वडिलांनी, तर यशस्वीला त्याच्या प्रशिक्षकांनी घडवलंय. सातत्याने मुंबईतील मैदान क्रिकेट खेळल्याने त्यांचा दर्जा दिसून आला.'  

मुंबईने यंदा आपल्या अखेरच्या रणजी साखळी सामन्यात आसामचा सहज पराभव केला. यामध्ये शार्दुलने पहिल्या डावात ६, तर दुसऱ्या डावात ४ बळी घेत सामनावीर पुरस्कार पटकावला. मुंबई संघ आता २३ फेब्रुवारीपासून घरच्या मैदानावर बडोद्याविरुद्ध उपांत्यपूर्व सामन्यात खेळेल. मुंबईत मंगळवारी हेल एनर्जीच्या कार्यक्रमात शार्दुलने आपल्या पुढील योजनांविषयी सांगितले की, 'सध्या माझे लक्ष रणजी स्पर्धेवर असून त्यानंतर पुढची तयारी करेन. नक्कीच मी आतापर्यंतच्या माझ्या अनुभवाचा फायदा संघाला करुन देतोय. संघात अनेक गुणवान युवा खेळाडू आहेत. दडपणाची स्थिती कशी हाताळावी हे युवांना मी माझ्या अनुभवातून सांगतोय.'

भारतीय संघातील पुनरागमनाविषयी शार्दुल म्हणाला की, ' आंतरराष्ट्रीय पुनरागमन माझ्या हाती नसून ते निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापनावर अवलंबून आहे. पण मी माझ्याकडून पूर्ण योगदान देण्याचा प्रयत्न करतोय. जे काही सामने खेळणार आहे त्यातून मी माझी कामगिरी उंचावण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय. त्याद्वारे मला भारतीय संघाचे दार खुले होतील, असा विश्वास आहे.' त्याचप्रमाणे, 'चाहत्यांकडून मिळालेली 'लॉर्ड' ही ओळख खूप चांगली वाटते. लोकांकडून मला मिळालेले हे प्रेम आहे आणि त्याचा मी पूर्ण आनंद घेतो,' असेही शार्दुल म्हणाला.

जिद्द सोडू नका!

शार्दुलने युवा खेळाडूंना संदेश दिला की, 'सुविधा उपलब्ध असतात, पण आपल्यालाही त्या सुविधा शोधल्या पाहिजेत. माझ नशीब चांगलं होतं की मी कधी माझ्या काकांकडे किंवा सरांकडे (प्रशिक्षक दिनेश लाड) राहू शकलो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वत:मध्ये जिद्द असावी लागते. कितीही कठीण प्रसंग असला तरी आपले लक्ष्य भरकटवू नका.'

Web Title: yashasvi jaiswal and sarfaraz shows khadoos attitude said shardul thakur while interact with lokmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.