Join us  

वृद्धीमान साहाची शतकी खेळी जवान अभिनंदन यांना समर्पित 

यष्टिरक्षक वृद्धीमान साहाने बुधवारी सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेत 62 चेंडूंत 129 धावांची तुफानी खेळी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 12:28 PM

Open in App

मुंबई : भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या यष्टिरक्षक वृद्धीमान साहाने बुधवारी सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेत 62 चेंडूंत 129 धावांची तुफानी खेळी केली. बंगालचे प्रतिनिधित्व करतान साहाने अरुणाचल प्रदेशच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. साहाने हे शतक भारतीय हवाई दलाचे जवान अभिनंदन वर्थमान यांना समर्पित केले आहे. अभिनंदन हे  पाकिस्तान सैन्याच्या ताब्यात आहेत. 

पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. अशातच पाकिस्तानकडून आगळीक सुरुच होती, त्याला प्रत्युत्तर म्हणून मंगळवारी भारतीय हवाई दलाने घरात घुसून पाकिस्तानला धडा शिकवला. बालोकेट येथील दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय हवाई दलाने 1000 किलो वजनाची स्फोटके टाकून हा बॉम्बहल्ला केला. त्यात जवळपास 300 हून अधिक दहशतवादी ठार झाले. बुधवारी पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरच्या सीमारेषेवरील भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय वायू सेनेने पाकिस्तानचा डाव उधळून लावला आहे. पाकिस्तानच्या विमानांची भारतीय हद्दीत घुसखोरी होताच, भारतीय विमानांनी हा हल्ला परतवून लावला. त्यामध्ये पाकिस्तानचे एक विमान नेस्तनाबूत करण्यात आले आहे. पाकिस्तानचे एफ 16 हे विमान कोसळले आहे. 

बुधवारी भारताच्या लढाऊ विमानाचं तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला आणि त्यातील जवान अभिनंदन हे पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. साहाने अभिनंदन यांच्या सुखरुपतेसाठी प्रार्थना केली. तो म्हणाला,''आजच्या शतकी खेळीचे कौतुक करणाऱ्या सर्वांचे आभार.. आजची ही खेळी माझ्यासाठी विशेष महत्त्वाची आहे आणि हे शतक मी भारतीय हवाई दलाचे जवान अभिनंदन यांना समर्पित करत आहे. ते भारतात सुखरूप परत यावे, अशी मी प्रार्थना करतो. जय हिंद.''  साहाने तुफानी खेळी साकारत साऱ्यांना मंत्रमुग्ध केले. नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या बंगालला सुरुवातीलाच दोन धक्के बसले. त्यानंतर फलंदाजीला साहा उतरला आणि त्याने गोलंदाजीची पिसे काढायला सुरुवात केली. साहाने फक्त 62 चेंडूंमध्ये 16 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 129 धावांची भन्नाट खेळी साकारली. यावेळी साहाचा स्ट्राइक रेट होता 208.06. साहाच्या या फलंदाजीच्या जोरावर बंगालला अरुणाचल प्रदेशविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 234 असा डोंगर उभारता आला. या आव्हानाचा पाछलाग करताना अरुणाचल प्रदेशला 20 षटकांमध्ये 4 बाद 127 धावा करता आल्या आणि बंगालने 107 धावांनी मोठा विजय साकारला.

टॅग्स :वृद्धिमान साहाएअर सर्जिकल स्ट्राईकपुलवामा दहशतवादी हल्ला