Join us  

शतक मारूनही मला का बाहेर बसवलं? भारतीय खेळाडूचा MS Dhoni वर गंभीर आरोप 

काही खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करूनही त्यांच्यासाठी भारतीय संघाचे दार कधीच उघडले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 10:29 AM

Open in App

Manoj Tiwary retirement ( Marathi News ) : भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवणे कोणत्याही खेळाडूसाठी नेहमीच कठीण असते. त्याला संघात स्थान मिळाले तर ते दीर्घकाळ टिकवून ठेवण्याचे सर्वात मोठे आव्हान समोर असते. अनेक आश्वासक खेळाडू संघातून खेळले, परंतु जास्त काळ टिकू शकले नाही. काही खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करूनही त्यांच्यासाठी भारतीय संघाचे दार कधीच उघडले नाही. हिच खंत आणि काही आरोप बंगालचा क्रिकेटपटू मनोज तिवारी याने केले आहे. तिवारीने रणजी करंडक स्पर्धेतील त्याच्या शेवटच्या सामन्यानंतर निवृत्ती घेतली, तेव्हा त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठी खंत व्यक्त केली. पण, त्याचवेळी त्याने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) वर टीका केली. 

मनोज तिवारीने २००८ साली भारतीय संघाकडून पदार्पण केले आणि त्याने ७ वर्षांत १२ वन डे व ३ ट्वेंटी-२० सामने खेळले. डिसेंबर २०११ मध्ये त्याने चेन्नई येथे वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद १०४ धावा करत आपले पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. मात्र, पुढची संधी मिळण्यासाठी त्याला आणखी ७ महिने वाट पाहावी लागली. निवृत्तीनंतर मनोज तिवारीने एका मुलाखतीत सांगितले की,''एखाद्या दिवशी माजी कर्णधार धोनीकडून मला जाणून घ्यायचे आहे की, शतक झळकावल्यानंतर आणि सामनावीराचा पुरस्कार जिंकल्यानंतरही मला सलग १४ सामन्यांसाठी का बाहेर ठेवले गेले? विराट कोहली, रोहित शर्मा आणि सुरेश रैना यांसारखे काही अव्वल खेळाडूही त्या मालिकेत धावांसाठी धडपडत होते. असे असताना २०१२  ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी मला दुर्लक्षित करण्यात आले.''

तो म्हणाला,''मला संधी मिळाल्यावर मी त्याला नक्कीच विचारेन. मी हा प्रश्न नक्कीच विचारेन की, शतक झळकावल्यानंतर मला संघातून का वगळण्यात आले, विशेषत: त्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जेथे कोणीही धावा काढत नव्हते, ना विराट कोहली, ना रोहित शर्मा, ना सुरेश रैना. आता माझ्याकडे गमावण्यासारखे काही नाही.''

याशिवाय कसोटी कॅप न मिळाल्याबद्दल मनोजने खंतही व्यक्त केली. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यांतील खेळी आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्याच्या आकडेवारीचा दाखला देत तिवारी म्हणाला की, युवराज सिंगने देशांतर्गत क्रिकेटमध्ये फार चांगला खेळ न करूनही भारतीय निवडकर्त्यांनी त्याची निवड केली. जेव्हा मी ६५ प्रथम श्रेणी सामने पूर्ण केले होते, तेव्हा माझी फलंदाजीची सरासरी ६५ च्या आसपास होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर आला आणि मी सराव सामन्यात १३० धावा केल्या, त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात ९३ धावा केल्या. मी संघात स्थान मिळवण्याच्या खूप जवळ होतो, पण त्यांनी युवराज सिंगची निवड केली. जेव्हा आत्मविश्वास शिखरावर असतो आणि कोणीतरी त्याचा नाश करतो तेव्हा तो त्या खेळाडूचा नाश करतो.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीऑफ द फिल्डरणजी करंडक