लाहोर : हाशिम आमला (७२*) आणि थिसारा परेरा (४६*) यांनी केलेल्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर विश्व एकादश संघाने दुस-या टी-२० सामन्यात यजमान पाकिस्तानचा ७ विकेट्सने पराभव केला. यासह विश्व एकदशने तीन सामन्यांच्या या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १७४ धावा काढल्यानंतर विश्व एकादशने एक चेंडू राखून ३ फलंदाजांच्या मोबदल्यात १७५ धावा काढल्या.
गद्दाफी स्टेडियमवर नाणेफेक जिंकून यजमानांनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पुन्हा एकदा बाबर आझम (४५) आणि अहमद शहजाद (४३) यांनी केलेल्या आक्रमक फलंदाजीमुळे पाकिस्तानने आव्हानात्मक मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना विश्व एकादशने चांगली सुरुवात केली. परंतु, सलामीवीर तमिम इक्बाल (२३), टीम पेन (१०) आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस (२०) झटपट परतल्यानंतर विश्व एकादशचा डाव १४ व्या षटकात ३ बाद १०६ असा घसरला. यानंतर मात्र, आमला व परेरा यांनी चौफेर फटकेबाजी करीत संघाला विजयी मार्गावर ठेवले. आमलाने ५५ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह नाबाद ७२ धावा फटकावल्या. परेरानेही त्याला चांगली साथ देत १९ चेंडूंत ५ षटकारांसह नाबाद ४७ धावांचा निर्णायक तडाखा दिला. अखेरच्या काही षटकांमध्ये केलेल्या सुमार क्षेत्ररक्षणाचा आणि अनियंत्रित माºयाचा फटका पाकला बसला.
तत्पूर्वी, शहजादने ३४ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह केलेल्या ४३ धावा आणि बाबरने ३८ चेंडूंत ५ चौकारांसह फटकावलेल्या ४५ धावांच्या जोरावर पाकने आव्हानात्मक मजल मारली. शोएब मलिकनेही २३ चेंडूत १ चौकार व ३ षटकारांसह ३९ धावांची छोटेखानी आक्रमक फटकेबाजी केल्याने पाकने दीडशेचा टप्पा पार करण्यात यश मिळवले. सॅम्युएल बद्री आणि परेरा यांनी प्रत्येकी २ बळी घेत यजमानांच्या धावगतीला ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला. (वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक :
पाकिस्तान : २० षटकांत ६ बाद १७४ धावा (बाबर आझम ४५, अहमद शहजाद ४३; थिसारा परेरा २/२३, सॅम्युएल बद्री २/३१) पराभूत वि. विश्व एकादश : १९.५ षटकांत ३ बाद १७५ धावा (हाशिम आमला नाबाद ७२, थिसारा परेरा नाबाद ४७; मोहम्मद नवाझ १/२५, इमाद वासिम १/२७)