नवी दिल्ली : कुणी शेतमजूर, कुणी दूध विकणारा तर कुणी आॅर्केस्ट्रात गाणे गाऊन पोटाची खळगी भरणारा... आयुष्याशी संघर्ष करणा-या नेत्रहीन विश्वचषक विजेत्या क्रिकेट संघातील भारतीय खेळाडूंची ही कहाणी आहे. आयपीएल लिलावात क्रिकेटपटूंवर कोट्यवधींचा पाऊस पडतो, तर दुसरीकडे या विश्वविजेत्यांची दखल घ्यायलादेखील कुणाकडे वेळ नाही.
शारजात पाकिस्तानला पराभूत करीत दुस-यांना वन डे विश्वचषक जिंकणा-या भारतीय संघातील १७ पैकी १२ खेळाडूंना जगण्यासाठी कुठलाही स्थायी आधार नाही. यापैकी सात खेळाडू विवाहबद्ध आहेत. मिळेल ते काम करीत आयुष्याचा गाडा ओढणा-या या खेळाडूंना खेळण्यासाठी बाहेर जाताना बरीच ओढाताण करावी लागते. बांगलादेशविरुद्ध उपांत्य लढतीत सामनावीर ठरलेला वलसाडचा गणेश मुंडकर २०१४ पासून भारतीय संघात आहे. दोन विश्वचषक, आशिया चषक, एक टी-२० विश्वचषक विजयात त्याचे योगदान राहिले. आई-वडील शेतमजूर आहेत. गणेश लहानशा किराणा दुकानात काम करतो. आर्थिक गणित बिघडल्यामुळे लहान भावाला तो शिक्षण देऊ शकला नाही. गणेश म्हणाला, ‘घरचे अनेकदा म्हणतात, क्रिकेट सोडून दे. पण क्रिकेट माझ्या रक्तात भिनले आहे. चार वर्षांपूर्वी विश्वचषक जिंकला त्या वेळी गुजरात सरकारने नोकरीचे आश्वासन दिले होते. मला अद्याप आश्वासनपूर्तीची प्रतीक्षा आहे.’ आंध्रच्या कूरनूलचा रहिवासी प्रेम कुमार दोन्ही डोळ्यांनी अंध आहे. तो आॅर्केस्ट्रात गाणे गातो. सात वर्षांचा असताना आजारामुळे त्याचे डोळे गेले. तो म्हणाला, ‘मी आॅर्केस्ट्रा आणि स्थानिक चॅनेलमध्ये गातो. याशिवाय मंच संचालन करणे आवडते. एका कार्यक्रमापोटी हजार ते दीड हजार रुपये मिळतात. महागणपती उत्सवात महिन्यात दहा आणि इतर वेळी दोन-तीन कार्यक्रम मिळतात.’
गुजरातच्या वलसाडचाच रहिवासी अनिल आर्य याच्या कुटुंबात आजी-आजोबा, पत्नी आणि दोन मुले ओहत. त्याचे महिन्याचे उत्पन्न १२ हजार. वडील काम मिळाल्यास शेतमजुरी करतात, तर अनिल दूध विकतो.
१२ वी पर्यंत शिकलेला अनिल दूध विकण्याच्या कामातून क्रिकेटसाठी वेळ काढतो. गावात अभ्यासाची सोय नाही. सर्व नेत्रहीनांनी राज्य सरकारकडे विनंती केली होती, पण त्याचा लाभ झाला नाही.
भारतात नेत्रहीन क्रिकेट महासंघाला बिगरशासकीय संस्थेचा दर्जा आहे. महासंघाचे सचिव असलेले भारतीय नेत्रहीन संघाचे कोच जॉन डेव्हिड म्हणाले, ‘अनुदान आणि रोजगार नसेल तर खेळाडू कुठपर्यंत वाटचाल करतील. मैदानावर हे खेळाडू प्रत्येक लढाई जिंकतात, पण आर्थिक पाठिंबा नसेल तर आयुष्याच्या लढाईत अपयशच येणार’.
बीसीसीआय व मंत्रालयाची मान्यता आवश्यक-
नेत्रहीन संघाचा ‘विराट कोहली’ अशी ख्याती असलेला आंध्रचा व्यंकटेश्वर राव हा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. त्याने पाकविरुद्ध चार शतके ठोकली आहेत. श्रीकाकुलम येथे तो अस्थायी शारीरिक शिक्षक आहे. आधी पाच हजार तर आता १४ हजार रुपये वेतन मिळते. स्थायी नोकरी नसल्यामुळे लग्नदेखील करू शकत नाही.
कर्णधार अजय रेड्डी म्हणाला, ‘क्रिकेटपटूंना एका विजयानंतर देशभर डोक्यावर घेतले जाते. आम्ही विश्वचषक दोनदा जिंकला, पण साधी दखल घ्यायला वेळ नाही. बीसीसीआय आणि क्रीडा मंत्रालयाची मान्यता नसल्याने ऐश्वर्यापासून आमचे खेळाडू वंचित आहेत.’
कोच जॉन डेव्हिड म्हणाले, ‘अनुदान आणि रोजगार नसेल तर खेळाडू कुठपर्यंत वाटचाल करतील. मैदानावर हे खेळाडू प्रत्येक लढाई जिंकतात, पण आर्थिक पाठिंबा नसेल तर आयुष्याच्या लढाईत अपयशच येणार’.