Join us  

वर्ल्ड कप विजेता प्रशिक्षक भारतीय महिला क्रिकेट संघाला करणार मार्गदर्शन?

टी-20 महिला विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील पराभवानंतर भारतीय महिला क्रिकेट संघात सुरू झालेल्या नाट्यात रोज नवीन वळण येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 8:56 AM

Open in App
ठळक मुद्देमहिला संघाच्या प्रशिक्षकपदासाठी गॅरी कर्स्टन यांचा अर्ज 2011 मध्ये कर्स्टन यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने जिंकला वर्ल्ड कप मनोज प्रभाकर, हर्षल गिब्स आणि डेव्ह वॉटमोर यांच्यात चढाओढ

मुंबई : टी-20 महिला विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील पराभवानंतर भारतीय महिला क्रिकेट संघात सुरू झालेल्या नाट्यात रोज नवीन वळण येत आहे. अनुभवी खेळाडू मिताली राजला न खेळवण्यावरून प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यावर झालेली टीका, पोवार यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर मागवलेले अर्ज, कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांनी पोवार यांची केलेली पाठराखण, त्यानंतर पोवार यांनी पुन्हा या पदासाठी केलेला अर्ज... या नाट्यात नवं वळण आलं आहे. भारतीय महिला संघाला मार्गदर्शन करण्यासाठी वर्ल्ड कप विजेत्या प्रशिक्षकानेही अर्ज केला आहे. दक्षिण आफ्रिकेचे माजी कसोटीपटू गॅरी कर्स्टन यांनी अर्ज केला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कर्स्टन यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय पुरुष संघाने 2011 च्या वन डे वर्ल्ड कप जिंकला होता. 

कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह भारताला वन डे वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या कर्स्टन यांच्या अर्जामुळे महिला संघाच्या प्रशिक्षकपदासाठीची चुरस अधिक वाढली आहे. या पदासाठी अतुल बेदाडे, डेव्हिड जॉन्सन, राकेश शर्मा, मनोज प्रभाकर, ओवेश शाह, हर्षल गिब्स, दिमित्री मास्करेन्हास, डॉमिनिक थॉरनेली, गार्गी बॅनर्जी, विद्युत जयसिन्हा, रमेश पोवार, कॉलिन सिलर आणि डेव्ह वॉटमोर यांनीही अर्ज केले आहेत. मात्र, यात कर्स्टन यांचे पारडे जड मानले जात आहे. इंडियन प्रीमिअर लीगमधील ( IPL) किंग्ज इलेव्हन पंजाबचे प्रशिक्षक माइक हेसन यानेही या पदासाठी इच्छा व्यक्त केली होती, परंतु त्याने अर्ज केला की नाही याची माहिती मिळालेली नाही. 

महिला संघाच्या प्रशिक्षकाची निवड तीन सदस्यीय समिती करणार आहे. या समितीत भारताचे माजी कर्णधार कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांचा समावेश आहे.  ही समिती कोणाची निवड करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मिताली राजसोबत झालेल्या वादानंतर पोवार यांच्या कार्यकाळात वाढ करण्यात आलेली नाही. 30 नोव्हेंबरला पोवारचा कार्यकाळ संपला आणि त्यानंतर बीसीसीआयने अर्ज मागवले. 

टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघबीसीसीआय