कोलंबो : भारताला २०११च्या एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना बहाल केल्याचा सनसनाटी आरोप करणारे श्रीलंकेचे तत्कालीन क्रीडामंत्री महिंदानंदा अलुथगमागे यांनी गुरुवारी ‘यू टर्न’ घेत, ‘ती लढत फिक्स असल्याची आपल्याला केवळ शंका येत असून तपास व्हावा,’ अशी सारवासारव केली.
लंका सरकारने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिसांच्या विशेष पथकाने अलुथगामगे यांची साक्ष नोंदवली. त्यावेळी त्यांनी आपल्याला केवळ शंका येत असल्याचे वक्तव्य केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना माजी मंत्री म्हणाले, ‘माझ्या शंकेचा तपास व्हावा, इतकीच माझी मागणी आहे. तत्कालीन क्रीडामंत्री या नात्याने ३० आॅक्टोबर २०११ रोजी आयसीसीला केलेल्या तक्रारीची प्रत मी पोलिसांना दिली आहे.’
>अलुथगामगे यांनी केलेला दावा तथ्यहीन असल्याचे सांगून माजी कर्णधार कुमार संगकारा आणि माहेला जयवर्धने यांनी फेटाळताना मंत्र्यांकडे पुरावे मागितले होते. त्यावेळी निवड समिती प्रमुख असलेले अरविंद डिसिल्व्हा यांनी तर दिग्गज सचिन तेंडुलकरसाठी तरी भारताने आरोपाची चौकशी करावी. कोरोना लॉकडाऊनमध्येही आपण चौकशीला सामोरे जाण्यासाठी तयार राहू, असे सांगून लंका बोर्डाने आणि सरकारनेही चौकशी करण्याची मागणी केली होती.