Join us  

World Cup 2019: भारतच विजयाचा दावेदार; पाकिस्तान विरुद्ध आज लढत

लढतीवर पावसाचे सावट; लोकेश राहुलच्या कौशल्याची परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 3:03 AM

Open in App

मँचेस्टर : भारतीय संघ आज रविवारी पाकिस्तान विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या विश्वचषकाच्या साखळी सामन्यात विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. या सामन्यावर पावसाचे सावट कायम असून, कडवे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या उभय संघातील सामना नेहमीच उत्कंठा शिगेला पोहचवणारा ठरला आहे.दोन्ही संघांसाठी हा सामना अन्य सामन्यांसारखाच असेल, पण चाहत्यांसाठी तो विशेष असेल. मोहम्मद आमीर आणि वहाब रियाज यांच्या माºयापुढे हा सामना लोकेश राहुलच्या फलंदाजी कौशल्याची परीक्षा घेणारा ठरेल. सचिनने भारतीय खेळाडूंना आमीर विरुद्ध अधिक आक्रमक होण्याचा सल्ला दिला असून, कर्णधार विराटने सहकाऱ्यांना विजयी मानसिकतेने खेळा, असे बजावले. पाक विरुद्ध प्रथमच खेळणाºया भारतीय खेळाडूंवर थोडे दडपण असेल, हे नक्की.भारत-पाक दरम्यान कुठलाही सामना असला तरी सामन्याचा निकाल चाहत्यांसाठी नायक किंवा खलनायक ठरविणारा असतो. तो आयुष्यभर स्मरणात राहतो. १९९६च्या विश्वचषकात अजय जडेजाने वकार युनूस विरुद्ध केलेली फटकेबाजी असेल किंवा सलीम मलिकने १९८७ मध्ये ईडनवर ३५ चेंडूत ठोकलेल्या ७२ धावा असतील, चाहत्यांना दोन्ही सामने आजही आठवतात.चेतन शर्माची विश्वचषकात हॅट्ट्रिक आणि लॉर्डस्वर त्याने घेतलेले पाच कसोटी बळी हे चाहत्यांच्या स्मरणात नाहीत तर १९८६ला त्याच्या अखेरच्या चेंडूवर शारजाहात जावेद मियांदादने मारलेला षटकार कायम स्मरणात आहे. लढतीवर पावसाचे सावट कायम आहे, हे माहीत असूनही चाहते ब्लॅकमध्ये तिकीट मिळविण्याची धडपड करीत आहेत, यावरून भारत-पाक लढतीची उत्सुकता लक्षात येते.भारताने विश्वचषकात सहा सामने खेळले. हे सर्व सामने एकतर्फी जिंकलेदेखील. सीमेवरील तणावामुळे उभय देशांत अनेक वर्षांपासून द्विपक्षीय मालिकेचे आयोजन झालेले नाही.कोहलीचे पाक विरुद्ध शानदार रेकॉर्ड आहे. २०१५ ला त्याने अ‍ॅडिलेडमध्ये शतक ठोकले. विश्वचषकात मात्र विराटने अद्याप शतक ठोकलेले नाही. हसन अली आणि शाहीन शाह आफ्रिदी यांनी अद्याप भारतीय दिग्गज गोलंदाजांपुढे मारा केला नसल्याने त्यांच्यासाठी आव्हान असेल. ओल्ड ट्रॅफोर्ड मैदान फलंदाजीसाठी उपयुक्त मानले जाते. पण परिस्थिती मात्र सीम आणि स्विंग चेंडूंसाठी पूरक समजली जाते. या सामन्यात भारताच्या मधल्या फळीला धावा काढाव्या लागतील.पीच रिपोर्टमँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफोर्डमध्ये ४५ एकदिवसीय सामन्यांत केवळ १८ वेळा प्रथम फलंदाजी घेतली गेली आहे. शेवटच्या पाच सामन्यांमध्ये सरासरी २६० धावा काढण्यात आल्या होत्या. प्रतिकूल हवामानाच्या स्थितीत प्रथम नाणेफेक जिंकणाºया संघाने प्रथम क्षेत्ररक्षण घेणे योग्य.उभय संघ यातून निवडणारभारत : विराट कोहली (कर्णधार),लोकेश राहुल, रोहीत शर्मा, विजय शंकर, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, केदार जाधव, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा आणि शिखर धवन.पाकिस्तान : सर्फराज अहमद (कर्णधार), फखर झमान, इमाम उल हक, बाबर आजम, हॅरिस सोहेल, हसन अली, शाहदाब खान, मोहम्मद हफीज, मोहम्मद हुसेन, शाहीन शाह आफ्रिदी, वहाब रियाज, मोहम्मद आमीर, शोएब मलिक, इमाम वसीम, आसिफ अली.हवामानाचा अंदाज :रविवारी येथे क्रिकेट खेळण्यासाठी हवामान चांगले असण्याची अपेक्षा नाही. येथे जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून, दिवसभर पडण्याची शक्यता आहे. दिवसभर आकाश ढगांनी आच्छादलेले राहण्याची शक्यता आहे. तापमान १४ डिग्री सेल्सिअस ते १७ डिग्री सेल्सिअस दरम्यान राहील. थंड वातावरणामुळे वातावरणात आर्द्रता असणार नाही.हेड टू हेडया दोन्ही संघांदरम्यान सन १९७८ पासून आतापर्यंत १३१ आंतरराष्टÑीय एकदिवसीय सामने झाले असून, त्यापैकी पाकिस्तानने ७३ सामने जिंकून वर्चस्व राखले आहे. भारताने ५४ सामने जिंकले आहेत. याशिवाय ४ सामने कोणत्याही निकालाविना संपले आहेत.या दोन्ही संघांमधील शेवटच्या पाच लढतीमधील ४ सामने भारताने जिंकले आहेत. एका सामन्यात पाकिस्तानला विजय मिळाला आहे.या दोन्ही संघांदरम्यान विश्वचषकामध्ये १९९२ पासून आतापर्यंत ६ सामने झाले असून, यातील सर्व सामन्यांमध्ये भारताला विजयश्री प्राप्त झाली आहे.विश्वचषकामध्ये भारताने पाकिस्तानच्या विरोधात ३०० तर पाकिस्तानने भारताविरूद्ध २७३ धावा अशी सर्वाेच्च धावसंख्या उभारली आहे.भारताची पाकिस्तान विरोधात २१६ धावांची नीचांकी खेळी आहे, तर पाकिस्तानची नीचांकी धावसंख्या १७३ आहे.

टॅग्स :वर्ल्ड कप 2019भारत विरुद्ध पाकिस्तान