सनरायझर्सचा कर्णधार केन विल्यम्सनने पराभवावर निराशा व्यक्त केली, पण त्याचसोबत वॉटसनची प्रशंसा केली. विल्यम्सन म्हणाला, ‘आम्ही आव्हानात्मक धावसंख्या उभारली, असे आम्हाला वाटत होते, पण शेन वॉटसनची प्रशंसा करावी लागेल. मी चेन्नई संघाचे अभिनंदन करतो. यंदाच्या मोसमात आम्ही जास्तीत जास्त सामन्यात चांगला खेळ केल्यामुळे हा पराभव निराशाजनक आहे.’
विल्यम्सन म्हणाला, ‘आम्ही आमच्याकडून चांगला प्रयत्न केला गेला; पण जेतेपद काही पटकावता आले नाही. यंदाच्या मोसमात अनेक सकारात्मक बाबींची भर पडली. प्रत्येक संघ समतोल साधण्याचा प्रयत्न करतो, पण आमची गोलंदाजीची बाजू मजबूत होती, यात शंका नाही.’
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सनने राशिद खानची प्रशंसा करताना आमच्या संघातर्फे खेळणाऱ्या अफगाणिस्तानच्या या फिरकीपटूचा जागतिक क्रिकेटमधील अव्वल फिरकीपटूंमध्ये समावेश असल्याचे म्हटले आहे. अलीकडेच संपलेल्या आयपीएलच्या ११ व्या पर्वात १९ वर्षीय राशिदने १७ सामन्यांत २१.८ च्या सरासरीने २१ बळी घेतले आहेत. आॅस्ट्रेलियाच्या अँड्य्रू टायनंतर (२४ बळी) तो दुसरा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज आहे. लेगस्पिनर राशिद आता पुढील महिन्यात बंगळुरूमध्ये भारताविरुद्ध अफगाणिस्तानच्या ऐतिहासिक पदार्पणाची कसोटी खेळण्याची तयारी करीत आहे. विल्यम्सन म्हणाला, ‘राशिद जागतिक दर्जाचा खेळाडू आहे. टी-२० मध्ये त्याची कामगिरी बघितली असून तो आता कसोटी सामना खेळणार आहे. कसोटी क्रिकेट प्रत्येकासाठी आव्हान असते, पण तो याचा आनंद घेईल.’ भविष्यात राशिदविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज असल्याचे विल्यम्सन म्हणाला.