Join us  

न्यूझीलंडविरोधात टी-20त विराटसेना विजयाचं खातं उघडणार का?

भारताचा वन-डेमध्ये न्यूझीलंडविरोधातील विजयाचा रेकॉर्ड चांगला असला तरी टी 20चे सर्व आकडे विराटसेने विरोधातच आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2017 6:58 PM

Open in App

नवी दिल्ली - नुकत्याच झालेल्या न्युझीलंड विरोधातील मालिकेत 2-1नं विजय मिळवत सलग सात मालिका विजयासह भारतीय संघानं ‘विजयाचा विराटाध्याय’ लिहिला आहे. पण वन-डेनंतर उद्यापासून भारत आणि न्यूझीलंडमध्ये तीन सामन्याच्या टी20 मालिकेला सुरुवात होतेय. वन-डेमध्ये न्यूझीलंडविरोधातील भारताचे विजयाचा रेकॉर्ड चांगला असला तरी टी 20चे सर्व आकडे भारताविरोधातच आहेत....विश्वविजेत्या भारतीय संघाला एका टी 20 सामन्यात न्यूझीलंडविरोधातील विजय मिळवता आला नाही. दोन्ही संघामध्ये पाच टी-20 सामने खेळले आहेत. हे पाचही सामने न्यूझीलंडनं जिंकलेत. 

भारतात दोन्ही संघात दोन सामने झाले आहेत...या दोन्ही सामन्यात भारताला पराभवला सामोर जावं लागलं आहे. न्यूझीलंडमध्येही झालेल्या दोन सामन्यात भारताला विजय मिळवता आला नाही. तटस्थ ठिकाणी झालेल्या एका सामन्यातही न्यूझीलंड संघानं बाजी मारली आहे. न्यूझीलंडविरोधातील एका विजयासाठी भारतीय संघाची प्रतिक्षा संपणार का? असा प्रश्न क्रिडा विश्वात विचारला जात आहे. सध्याची भारतीय संघाची स्थिती पाहता हा दुष्काळ नक्कीच संपू शकेल. कारण सध्या भारत तिन्ही प्रकारात क्रमांक एकसाठी प्रयत्न करत आहे. या वर्षी भारतानं सात टी 20 सामने खेळले आहेत. यामध्ये चार सामन्यात विजय तर तीन मध्ये पराभव आला आहे. न्यूझीलंडचा विचार करता त्यांनी चार सामने खेळले असून यातील तीन सामन्यात त्यांना विजय मिळाला आहे. तर एका सामन्यात त्यांना पराभवचे तोंड पहावं लागेलेय. यावर्षी टी 20तील भारताची विजयाची टक्केवारी 57.14 तर न्यूझीलंडची 75 टक्के आहे. 

उद्याचा नेहराचा अखेरचा सामना - आशिष नेहराने यापूर्वीच निवृत्तीची घोषणा केली असून त्यामुळे उद्याचा सामना हा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतला अखेरचा सामना असेल. गेल्या 19 वर्षांपासूनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आशिष नेहराचा प्रवास उद्या फिरोजशाह कोटला मैदानावर थांबणार आहे.आशिष नेहरा मोहम्मद अझरुद्दीनपासून ते विराट कोहलीच्या नेतृत्त्वात खेळला असून शिवाय महेंद्र सिंह धोनी, राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवागच्या नेतृत्त्वातही तो खेळला आहे. विराट कोहली दहा वर्षांचा असताना नेहराने क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.

नेहराने 2011 च्या विश्वकप विजेत्या आणि 2003 साली विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत मजल मारणाऱ्या भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. नेहराने 19 वर्षांपूर्वी म्हणजे 1999 साली कसोटीत पदार्पण केलं होतं. त्याने आतापर्यंत 17 कसोटी, 120 वन डे आणि 26 टी-20 सामने खेळले आहेत.

Open in App