Join us  

भारताचे निवड समिती अध्यक्ष दिलीप वेंगसरकर होणार? कोहली, शास्त्रींवर अंकुश ठेवणार

एमएसके प्रसाद यांच्या निवड समितीला कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री गुंडाळून ठेवले होते, असे म्हटले जात होते. त्यामुळे आता हे दोघे ज्या माजी खेळाडूचा सन्मान करतील आणि त्यांच्या मनात आदरयुक्त भिती असेल, अशी व्यक्ती निवड समिती अध्यक्षपदासाठी निवडण्यात येणार आहे.

By प्रसाद लाड | Published: November 02, 2019 1:36 PM

Open in App

मुंबई : एमएसके प्रसाद यांच्या निवड समितीवर सर्वांनीच जोरदार टीका केली होती. त्यामुळे आता कोणालाही बोट ठेवायला द्यायचे नाही, अशी निवड समिती बनवण्याचा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांचा मानस आहे. त्यामुळे आगामी निवड समिती अध्यक्षपदासाठी सर्वात प्रधान्याने माजी क्रिकेटपटू आणि माजी निवड समिती अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांचे नाव घेतले जात असल्याची चर्चा आहे.

वेंगसरकर यांनी यापूर्वीही निवड समितीचे अध्यक्षपद भुषवले आहे. वेंगसरकर यांचा कालावधी हा भारतीय क्रिकेटमधील सुवर्णकाळ असल्याचे म्हटले जाते. कारण महेंद्रसिंग धोनीला कर्णधारपदी विराजमान करण्याचा महत्वपूर्ण निर्णय वेंगसरकर निवड समिती अध्यक्ष असताना घेतला गेला होता. त्याचबरोबर भारताने त्यांच्या कालावधीमध्ये बरेच विजय मिळवले होते. यामध्ये विश्वचषकाचाही समावेश आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निवड समिती अध्यक्षपदासाठी वेंगसरकर यांचे नाव चर्चेत आले आहे.

भारताचे माजी क्रिकेटपटू फारुख इंजिनिअर यांनी दोन दिवसांपूर्वी निवड समितीवर टीका केली होती. ही निवड समिती इंग्लंडमधील विश्वचषकात कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माचे चहाचे कप उचलत होती, अशी टीका त्यांनी केली होती. त्यानंतर अनुष्काने त्यांना उत्तरही दिले होते. पण या सर्व प्रकारामध्ये इंजिनिअर यांनी सांगितलेली एक गोष्ट सारेच विसरून गेले. त्यांनी ही टीका करताना म्हटले होते की, " सध्याच्या निवड समिती सदस्यांनी 12 कसोटी सामनेही खेळलेले नाहीत. निवड समिती अध्यक्ष कसा असावा, तर तो दिलीप वेंगसरकरसारखा असावा." इंजिनिअर यांनी केलेले हे वक्तव्य सध्याच्या घडीला महत्वाचे आहे.

सध्याच्या निवड समितीचा कार्यकाळ संपला आहे. आता बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये अपेक्षित आहे. या सभेमध्ये निवड समितीची स्थापना करण्यात येणार आहे. यावेळी वेंगसरकर यांचे नाव निवड समितीच्या अध्यक्षपदी घेतले जाईल, असे म्हटले जात आहे.

याबाबत सूत्रांनी सांगितले की, " सध्याच्या घडीला निवड समिती अध्यक्षपदी कणखर व्यक्तीची गरज आहे. एमएसके प्रसाद यांच्या निवड समितीला कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री गुंडाळून ठेवले होते, असे म्हटले जात होते. त्यामुळे आता हे दोघे ज्या माजी खेळाडूचा सन्मान करतील आणि त्यांच्या मनात आदरयुक्त भिती असेल, अशी व्यक्ती निवड समिती अध्यक्षपदासाठी निवडण्यात येणार आहे. वेंगसरकर यांना निवड समिती अध्यक्षपदाचा चांगलाच अनुभव आहे. त्याचबरोबर ते स्पष्टवक्ते आहेत. त्यामुळे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे."

टॅग्स :सौरभ गांगुलीमहेंद्रसिंग धोनीबीसीसीआय