ठळक मुद्देइंग्लंडच्या एका उगवत्या ताऱ्यानं अवघ्या २५ चेंडूत शतक झळकावण्याचा विक्रम केला आहे.३० चेंडूंत १०५ धावांची खेळी करताना त्यानं ११ षटकार आणि ८ चौकार तडकावले.विल जॅक्सनं एका ओव्हरमध्ये सहा चेंडूंवर सहा षटकार ठोकले.
भारतात आयपीएलचे वारे वाहू लागलेत. धावांचा धुमशान पाऊस पाडण्यासाठी, चौकार-षटकारांची आतषबाजी करण्यासाठी रथी-महारथी सज्ज झालेत. अशातच, इंग्लंडच्या एका उगवत्या ताऱ्यानं अवघ्या २५ चेंडूत शतक झळकावण्याचा विक्रम रचल्याची बातमी आली आहे. त्या भिडूचं नाव आहे, विल जॅक्स.
दुबईत सुरू असलेल्या टी-१० तिरंगी मालिकेत इंग्लंडचा सरे काउंटी क्रिकेट क्लब आणि लँकशायर क्रिकेट क्लब आमनेसामने उभे ठाकले होते. या सामन्यातच 'सरे'च्या विल जॅक्सनं तुफान फटकेबाजी केली. ३० चेंडूंत १०५ धावांची खेळी करताना त्यानं ११ षटकार आणि ८ चौकार तडकावले. २५ चेंडूतच त्यानं आपलं शतक साजरं केलं. प्रोफेशनल क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या फलंदाजानं झळकावलेलं हे सर्वात वेगवान शतक मानलं जातंय. लँकशायरचा गोलंदाज स्टीफन पेरी याच्या एका ओव्हरमध्ये विल जॅक्सनं सहा चेंडूंवर सहा षटकार ठोकले. पेरी इंग्लंडकडून वनडे आणि टी-२० क्रिकेट खेळला आहे.
विल जॅक्स २० वर्षांचा असून फेब्रुवारी महिन्यात तो इंग्लंड लायन्स संघाकडून भारत अ संघाविरुद्ध कसोटी सामना खेळला होता. त्यात त्यानं ६३ धावांची खेळी केली होती.
मी फलंदाजीचा आनंद लुटण्यासाठी खेळलो. सगळं इतकं झटपट झालं की समजलंच नाही. ९८ धावांवर पोहोचल्यावर मी शतकाचा विचार करायला सुरुवात केली, अशी प्रतिक्रिया जॅक्सनं व्यक्त केली.