Join us  

इंग्लिश क्रिकेटपटू सोशल मीडियाला ठोकणार रामराम?, वेगवान गोलंदाज ब्रॉड याने दिली माहिती

Stuart Broad : इंग्लंडचे क्रिकेटपटू सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर बहिष्कार घालण्याच्या तयारीत आहेत. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने ही माहिती दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 7:01 AM

Open in App

लंडन : सोशल मीडियावरील खेळाडूंच्या गैरवर्तनाविरोधात इंग्लंड क्रिकेट बोर्डाने कठोर पाऊल उचलण्याचे संकेत दिले आहेत. इंग्लंडचे क्रिकेटपटू सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर बहिष्कार घालण्याच्या तयारीत आहेत. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने ही माहिती दिली. अलीकडेच सोशल मीडियावर फिरकीपटू मोईन अली आणि जोफ्रा आर्चरवर टीका करण्यात आली. यासंदर्भात ब्रॉड म्हणाला, ‘सोशल मीडियाचे बरेच लाभ आहेत, तथापि काही चुकीचे घडत असेल, तर आपल्याला यापासून काही काळ दूर जावे लागेल आणि त्यासाठी पूर्णपणे तयार आहोत.’ब्रॉड म्हणाला, ‘यासंदर्भात कोणताही निर्णय ड्रेसिंग रूममधील वरिष्ठ खेळाडू घेतील. संघाला असे वाटत असेल की एखाद्या बदलाची गरज आहे, तर ज्यांना इंग्लिश क्रिकेटची विचारसरणी माहिती आहे, त्याचे मत निर्णायकपणे विचारात घेण्यात येईल. जे सोशल मीडियाचा गैरवापर करतात त्यांच्यासाठी हा मोठा संदेश असेल.’ इंग्लंड क्रिकेट संघापूर्वी देशातील अनेक फुटबॉल क्लब्सने सोशल मीडियावर बहिष्कार टाकण्याविषयी मत मांडले. वांशिक अत्याचारानंतर फुटबॉलपटूंनी हा निर्णय घेतला होता.

तस्लिमा नसरीन यांचे ट्विट- काही दिवसांपूर्वी, बांगलादेशच्या लेखिका तस्लिमा नसरीन यांनी इंग्लंडचा फिरकीपटू मोईन अलीबद्दल वादग्रस्त ट्विट केले होते. ‘मोईन क्रिकेट खेळला नसता, तर तो इसिस या दहशतवादी संघटनेत सामील झाला असता,’ असे नसरीन यांनी म्हटले होते.तुम्ही ठीक आहात?-आर्चर- नसरीन यांचे ट्विट मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाले. अनेकांनी त्याला तिखट उत्तरे दिली. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने नसरीन यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना, ‘तुम्ही ठीक आहात? मला, वाटत नाही, की तुम्ही ठीक असाल’, असे म्हटले होते. रायन साइडबॉटमनेही नसरीन यांना हे ट्विट हटविण्याचा सल्ला दिला. - साइडबॉटमने लिहिले, ‘मला वाटते, तुम्हाला आरोग्याच्या बाबतीत तपासणी करण्याची गरज आहे. आपण आपले अकाउंटच हटविले तर ते बरे होईल.’ 

टॅग्स :इंग्लंडस्टुअर्ट ब्रॉड