Join us  

चार धावांत संपूर्ण संघ माघारी, एकही फलंदाज फोडू शकला नाही 'भोपळा'! 

ट्वेंटी-20 फॉरमॅटमुळे क्रिकेट हा आता केवळ फलंदाजांचा खेळ बनला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 11:34 AM

Open in App

केरळ : ट्वेंटी-20 फॉरमॅटमुळे क्रिकेट हा आता केवळ फलंदाजांचा खेळ बनला आहे. आंतरराष्ट्रीय वन डे सामन्यातही त्याची अनेकदा प्रचिती आली आहे. नुकतीच घटना सांगायची तर पाकिस्तानने विजयासाठी ठेवलेले 359 धावांचे लक्ष्य इंग्लंडने 6 विकेट व 31 चेंडू राखून सहज पार केले. यावरून क्रिकेटमध्ये गोलंदाजांची अधोगती होत चालल्याचे दिसून येत आहे. पण, याला एक घटना अपवाद ठरली आहे. केरळमध्ये एका स्थानिक सामन्यात संपूर्ण संघ अवघ्या 4 धावांत माघारी परतल्याचा प्रसंग घडला.

केरळच्या मालापुरम जिल्ह्यातील पेरिनथमाला स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात वायनाडविरुद्ध 19 वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत कसारागॉडचा संपूर्ण संघ चार धावांत तंबूत परतला. या संघातील एकाही फलंदाजाला धावाचे खाते उघडता आले नाही. विशेष म्हणजे संघातील 11 वा खेळाडूही भोपळ्यावर नाबाद राहिला.

या सामन्यातील आणखी एक वैशिष्ट म्हणजे दहाही खेळाडू त्रिफळाचीत झाले आणि क्रिकेटच्या इतिहासात असे प्रथमच घडले असावे. सर्व फलंदाज शून्यावर बाद झाले असले तरी वायनाडच्या गोलंदाजांची चार अतिरिक्त धावा दिल्याने कसारागॉड संघाचे खाते उघडले. वायनाडने सामना पहिल्याच षटकात जिंकला. वायनाडची कर्णधार नित्या लूर्धआने सहा चेंडूंत तीन फलंदाज माघारी पाठवले.   

टॅग्स :केरळ