Join us  

टीम इंडियाचा पुढील कोच कोण? रवी शास्त्रींना टक्कर देण्यासाठी पाच जण शर्यतीत

वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकासह अन्य महत्त्वाच्या पदांसाठी अर्ज मागवले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 3:09 PM

Open in App

मुंबई : वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकासह अन्य महत्त्वाच्या पदांसाठी अर्ज मागवले होते. मंगळवारी या पदांसाठीची अर्ज करण्याची मुदत संपली असून रवी शास्त्री यांच्या पदावर दावा सांगण्यासाठी पाच जणांचे अर्ज आले आहेत. मुख्य प्रशिक्षक निवडण्याची जबाबदारी ही कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय सल्लागार समितीकडे असेल आणि या प्रक्रियेत कोहलीचे मत घेतले जाणार नसल्याचे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. पण, कॅप्टन विराट कोहलीनं या पदासाठी रवी शास्त्रींच्या पक्षात वजन टाकल्यानं निवड प्रक्रियेत वळण येण्याची चिन्हे आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार या पदासाठी ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू टॉम मूडी यांच्यासह न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन, श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने, भारताचा माजी खेळाडू रॉबीन सिंग आणि भारताचे माज व्यवस्थापक आणि झिम्बाब्वे संघाचे प्रशिक्षक लालचंद राजपूत यांनी अर्ज केले आहेत. त्याशिवाय भारताचे माजी कसोटीपटू प्रविण आम्रे यांनीही फलंदाजी प्रशिक्षक, तर दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जाँटी ऱ्होड्सने क्षेत्ररक्षक प्रशिक्षकपदासाठी अर्ज केले आहेत.

माईक हेसन आणि टॉम मूडी

कोहलीला मुख्य प्रशिक्षक म्हणून शास्त्रीच हवे आहेत आणि हे त्यानं उघडपणे जाहीरही केले आहे. कोहली म्हणाला,'' रवी शास्त्रीच प्रशिक्षकपदी कायम राहिल्यास मला आणि संघाला आनंद होईल. क्रिकेट सल्लागार समितीनं याबाबत माझ्याकडे मत मागितलेले नाही आणि ही प्रक्रिया कशी पार पाडेल, हेही मला माहीत नाही. पण, सल्लागार समितीनं माझं मत विचारल्यास, मी त्यांच्याशी चर्चा करीन. शास्त्रींसोबत संघ चांगली कामगिरी करत आहे आणि आम्ही एकमेकांचा आदर करतो. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळायला आवडेल.'' 

रॉबीन सिंग आणि लालचंद राजपूत
भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्यासह माजी फलंदाज व प्रशिक्षक अंशुमन गायकवाड व महिला संघाची माजी कर्णधार शांता रंगास्वामी सल्लागार समितीचे सदस्य आहेत. ही समितीच प्रशिक्षकपदाचा अंतिम निर्णय घेणार आहे. सध्या रवी शास्त्री आणि त्यांच्या टीमला 45 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर नवीन प्रशिक्षक निवडला जाईल.

टॅग्स :बीसीसीआयरवी शास्त्री