Join us  

महेंद्रसिंग धोनी निवृत्ती घेणार कधी; निवड समिती अध्यक्षांनी सोडले मौन

भारतीय संघात सध्या यष्टीरक्षणाबाबत काही प्रयोग सुरु आहेत. त्यामुळे आता यापुढे धोनी खेळणार की निवृत्ती घेणार, याबाबत चर्चा सुरु झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2020 5:42 PM

Open in App

मुंबई : सध्याच्या घडीला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी चर्चेचा विषय ठरत आहे. कारण भारतीय संघात सध्या यष्टीरक्षणाबाबत काही प्रयोग सुरु आहेत. त्यामुळे आता यापुढे धोनी खेळणार की निवृत्ती घेणार, याबाबत चर्चा सुरु झाली आहे.

धोनीला पर्याय म्हणून रिषभ पंतला संघात स्थान देण्यात आले होते. पंतला बऱ्याच संधी देण्यात आल्या. पण या संधीचा फायदा पंतला घेता आला नाही. त्यामुळे पंत सध्या संघाच्या बाहेर आहे. सध्याच्या घडीला भारताच्या यष्टीरक्षणाची जबाबदारी लोकेश राहुलवर सोपवण्यात आली आहे.

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर तो सैन्यदलाच्या सेवेतही रुजू झाला होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिलेल्या धोनीला सेंट्रल करारातून वगळण्यात आले. पण धोनीने फक्त एक गोष्ट केली की, त्याला पुन्हा एकदा बीसीसीआय आपल्या करारामध्ये सामील करून घेऊ शकते.

धोनीला जर आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरागमन करायचे असेल, तर त्याला एक गोष्ट निश्चितच करावी लागेल. धोनीला इंडियन प्रीमिअर लीगमध्ये दमदार कामगिरी करावी लागेल. आयपीएलमध्ये धोनीनं चांगली कामगिरी केल्यास त्याचा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. धोनीला सेंट्रल करार न देऊन बीसीसीआयनं जेवढे सामने खेळाल, तेवढंच मानधन मिळेल असे संकेत दिले आहेत. करारामधून वगळले म्हणजे धोनी भारताकडून खेळू शकत नाही, असा याचा अर्थ होत नाही.

भारताचे माजी निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद म्हणाले की, " निवड समिती नेहमीच युवा खेळाडूंना संधी देत असते. युवा खेळाडूंना पुरेशी संधी देऊन त्यांना संघातील स्थान कसे निर्माण करता येईल आणि संघाला त्यांच्या कामगिरीचा कसा फायदा होईल, हे आम्ही पाहत असतो. त्यामुळे आगामी स्पर्धा पाहिल्या तर युवा खेळाडूंना जास्त संधी द्यायला हव्यात, असे माझे वैयक्तिक मत आहे."

ते पुढे म्हणाले की, " एक खेळाडू म्हणून मला विचाराल तर मी धोनीचा फार मोठा चाहता आहे. धोनी एक कर्णधार म्हणून महान होता आणि एक खेळाडू म्हणूनही उत्तम आहे. पण आता धोनीला कधी खेळायचे आहे किंवा निवृत्ती घ्यायची आहे, हा निर्णय त्यालाच घ्यावा लागेल. कारण धोनीसारख्या महान खेळाडूंना आपण कधी निवृत्ती घ्यावी, हे चांगलेच माहिती असते." 

बीसीसीआयने जाहीर केलेला करार हा सप्टेंबर २०१९ ते सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी आहे. धोनी सप्टेंबर २०१९ पासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. पण धोनी आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकात खेळू शकतो. हा विश्वचषक ऑक्टोबर महिन्यात खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे त्यावेळी बीसीसीआयचे नवीन करार करावा लागणार आहे. त्यामुळे धोनी हा आगामी करारामध्ये आपल्याला दिसू शकतो.

या विश्वचषकापूर्वीही धोनी आपल्याला बीसीसीआयच्या कराराच्या यादीत दिसू शकतो. धोनी जर ट्वेन्टी-२० विश्वचषकापूर्वी खेळला तर बीसीसीआयला धोनीला आपल्या करारामध्ये सामील करून घ्यावे लागेल. यासाठी बीसीसीआयने एक तरतूद केलेली आहे. धोनी जर विश्वचषकापूर्वी खेळला तर त्याला 'प्रो-रेटा' या तत्वावर बीसीसीआयच्या करारामध्ये सामील करण्यात येऊ शकते.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनी