नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक करणाऱ्या सचिनने यातील एक शतक आपल्या वाढदिनी म्हणजे २४ एप्रिलला झळकावले होते. यावेळी त्याने ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न याची धुलाई केली होती. यानंतरही वॉर्नने त्याचा ‘ऑटोग्राफ’ घेतला होता.
तेंडुलकर व वॉर्न यांच्यातील क्रिकेटमधील द्वंद्व सर्वांनाच माहीत आहे. मात्र शारजाह येथे २४ एप्रिल १९९८ रोजी झालेल्या सामन्यावेळी वॉर्न तेंडुलकरपुढे हतबल झाला होता. मास्टर ब्लास्टर सचिनने त्याची जबरदस्त धुलाई केली होती.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सचिनने डॉक्टर, नर्स, पोलीस, सेनादल, सफाई कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांच्या सन्मानार्थ आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला. मात्र सचिनने २२ वर्षांपूर्वी आपला २५ वा वाढदिवस खूप जल्लोषात साजरा केला होता. या दिवशी त्याला दोन ‘भेटी’पण मिळाल्या होत्या. भारताने तेंडुलकरच्या कामगिरीच्या जोरावर शारजाहमध्ये तिरंगी मालिका जिंकली होती. या मालिकेत तेंडुलकरने अंतिम सामन्यात सामनावीर व मालिकावीरचा पुरस्कार पटकावला होता. यावेळी वॉर्नने आपला शर्ट काढून त्यावर सचिनची सही मागितली होती.हा क्षण स्पर्धेतील सर्वात अविस्मरणीय होता.
एका मुलाखतीत सचिनने या क्षणाची आठवण सांगितली होती. तो म्हणाला, ‘सामन्यानंतर पुरस्कार सोहळा सुरू होता. त्यावेळी स्टीव्ह वॉ म्हणाला होता की, तो माझ्याकडून पराभूत झाला. माझ्या वाढदिवसाची यापेक्षा मोठी भेट कोणती असेल.’
रिकाम्या स्टेडियममध्ये क्रिकेट निराशादायी असेल
सचिन खेळताना स्टेडियममध्ये त्याच्या नावाचा जयघोष व्हायचा. यामुळे रिकाम्या स्टेडियममध्ये खेळणे सचिनला निराशादायी वाटते. प्रेक्षकांविना खेळविण्याचा प्रस्ताव येत असला तरी सचिनच्या मते हा प्रस्ताव योग्य नव्हे. रिकामे मैदान खेळाडूंसाठी निराशादायी असेल.‘माझा शॉट प्रेक्षकांना आवडत असेल तर मलाही ऊर्जा लाभते,’ असे सचिन म्हणाला.