Join us  

जेव्हा सचिन तेंडुलकर पहिल्यांदाच सामनावीर झाला, तेव्हा इंग्लंडच्या पत्रकाराने विचारला होता ' हा ' खोचक प्रश्न

सचिनने जेव्हा भारताला पराभवापासून परावृत्त करत पहिल्यांदा सामनावीराचा पुरस्कार पटकावला, तेव्हा त्याला एका इंग्लंडच्या पत्रकाराने ' हा ' खोचक प्रश्न विचारला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 12:10 PM

Open in App
ठळक मुद्देत्या इंग्लंडच्या पत्रकाराचा सचिनला वादामध्ये अडकवण्याचा प्रयत्न निरर्थक ठरला.

लंडन : एखादा व्यक्ती महान असेल तर त्याचे टीकाकारही प्रचंड असतात. त्या महान व्यक्तीवर टीका करून आपण मोठे होतो, असे बऱ्याच जणांना वाटत असते. भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर या गोष्टीमधून सुटलेला नाही. सचिनने जेव्हा भारताला पराभवापासून परावृत्त करत पहिल्यांदा सामनावीराचा पुरस्कार पटकावला, तेव्हा त्याला एका इंग्लंडच्या पत्रकाराने ' हा ' खोचक प्रश्न विचारला होता.

भारताचा संघ 1990 साली इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी दुसरा कसोटी सामना ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळवला गेला होता. इंग्लंडने भारतापुढे 408 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची 6 बाद 183 अशी अवस्था होती. भारताचे सर्वच दिग्गज फलंदाज तंबूत परतले होते. भारत हा सामना गमावणार, अशी चर्चा रंगायला सुरुवात झाली. त्यावेळी सचिन तेंडुलकरने नाबाद 119 धावांची खेळी साकारली आणि भारताला पराभवापासून परावृत्त केले. इंग्लंडच्या खेळाडूंनीही यावेळी सचिनचे अभिनंदन केले.

जिगरबाज शतकी खेळीमुळे सचिनला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सचिनच्या कारकिर्दीतील हा पहिला सामनावीराचा पुरस्कार होता. त्यामुळेच त्यालाच पत्रकार परिषदेला पाठवले. त्यावेळी एका पत्रकाराने सचिनला खोचक प्रश्न विचारला होता. पत्रकाराने सचिनला त्याच्या खेळीबद्दल विचारण्याऐवजी, ' तू श‌म्पेनची बाटली फोडलीस का? ' असा प्रश्न विचरला. सचिन त्यावेळी फक्त 17 वर्षांचा होता. हा प्रश्न आपल्याला का विचारला गेला, हे सचिनला समजले. कोणत्याही विवादात पडण्यापेक्षा सचिनने ' नाही ' असे उत्तर दिले आणि त्या इंग्लंडच्या पत्रकाराचा सचिनला वादामध्ये अडकवण्याचा प्रयत्न निरर्थक ठरला.

टॅग्स :सचिन तेंडुलकरक्रिकेट