इंदूर - कमकुवत मानल्या जाणा-या खेळाडूंसह भारतातील सर्वांत प्रतिष्ठेच्या स्थानिक स्पर्धेत जेतेपद पटकावणे छोटी उपलब्धी मानता येणार नाही; पण विदर्भाचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांना मात्र तसा विश्वास होता. रणजी मोसमाच्या सुरुवातीला त्यांनी मिळणाºया पुरस्कार रकमेबाबत विचारणा करणे सुरू केले होते.
पाच दशकांच्या प्रयत्नानंतर प्रथमच रणजी स्पर्धेत जेतेपद पटकावल्यानंतर विदर्भ क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष (व्हीसीए) प्रशांत वैद्य यांनी या आठवणींना उजाळा दिला. गेल्या मोसमात करारबद्ध झाल्यानंतर पंडित यांनी विचारले होते की, पुरस्कार राशीचे काय करणार?
या प्रश्नामुळे आश्चर्यचकित झालेल्या व्हीसीएच्या पदाधिकाºयाने पंडित यांना कुठल्या पुरस्कार रकमेबाबत बोलत असल्याचे विचारले? यावर अनेकदा रणजी विजेतेपदाचा मान मिळवणारे प्रशिक्षक म्हणाले, की रणजी विजेत्या संघाला मिळणाºया पुरस्कार राशीबाबत बोलत आहे. अंतिम लढतीत विदर्भाने दिल्लीचा ९ गडी राखून पराभव केल्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना वैद्य म्हणाले, ‘विजेतेपद पटकावण्याचा त्यांच्यात आत्मविश्वास होता. ते विजेतेपदाबाबत विचार करीत होते. त्यामुळे यंदाचे सत्र विदर्भासाठी चांगले राहील, असे मला वाटले. पंडित यांनी नागपुरात पाऊल ठेवले त्या दिवसापासून माझा त्यांच्या कामगिरीवर विश्वास बसला.’
प्रथम श्रेणी प्रशिक्षक म्हणून पंडित यांची कामगिरी शानदार आहे. या माजी भारतीय क्रिकेटपटूने प्रशिक्षक म्हणून संघाला तीनदा जेतेपद मिळवून दिले. या कालावधीत त्यांचा संघ चार वेळा अंतिम फेरीत खेळला. गेल्या मोसमात गुजरातविरुद्ध अंतिम लढतीत मुंबई संघाला पराभव स्वीकारावा लागल्यानंतर त्यांची प्रशिक्षक पदावरून उचलबांगडी केली. मुंबईचे हे नुकसान विदर्भासाठी लाभदायक ठरले. कारण रणजी विजेता खेळाडू व प्रशिक्षक म्हणून पंडित यांचा अनुभव संघासाठी उपयुक्त ठरला.
पंडित म्हणाले, ‘मी नेहमी उपलब्धीबाबत विचार करतो. सर्वच संघ जेतेपद पटकावण्यास प्रयत्नशील असतात. पण माझ्या मते, या विजेतेपदामुळे केवळ संघाची मानसिकताच बदलणार नाही तर युवांवरही याचा प्रभाव पडेल. १४ किंवा १६ वर्षांचे खेळाडू आम्ही विजेतेपद पटकावू शकतो, असे ठामपणे सांगू शकतील. विदर्भाच्या अशा प्रकारच्या संस्कृतीचा मला आनंद होईल.’
काम करण्याची पंडित यांची स्वत:ची शैली आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप आवडत नाही.
पंडित म्हणाले, ‘आम्ही आपले नियमित कार्य करतो. या विजेतेपदाचे सर्व श्रेय खेळाडूंना जाते; कारण त्यांनी कसून मेहनत घेतली. त्यांनी मला दिलेल्या आदरामुळे मी खूश आहे. खेळाडूंनी दिलेल्या निर्देशांचे पालन केले.’
(वृत्तसंस्था)
जर कामगिरी चांगली झाली नाही तर संघ एकजूट नसल्याचे म्हटले जाते. सपोर्ट स्टाफही तेवढीच मदत करतो. गोलंदाजी प्रशिक्षक सुब्रतो बॅनर्र्जींचे चांगले सहकार्य लाभले. वेगवान गोलंदाजांची कामगिरी बघितल्यानंतर हे लक्षात येते. रजनीश गुरबानीला चांगली मदत झाली. वसीम जाफर, सतीश आदर्श आहेत. आज अक्षय वाडकरसारख्या युवा खेळाडूने चांगली कामगिरी केली. कारण फैज फझलसारख्या खेळाडूंनी ड्रेसिंग रूममध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण केली.
- चंद्रकांत पंडित