Join us  

मर्दुमकी आणि नामुष्कीचे युवराज व परेरात काय आहे साम्य!

क्रिकेटची दुनिया नवलाईची आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन खेळाडूंच्या नावावर अशी नवलाई नोंदली गेली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2019 2:01 PM

Open in App

ललित झांबरे : कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये एकाच षटकात ३० पेक्षा अधिक धावा कमावणे ही मर्दुमकी आणि ३० पेक्षा अधिक धावा गमावणे ही नामुष्की! असे क्वचितच घडते पण फारच थोड्या वेळा घडणाऱ्या अशा प्रसंगांमध्येही मर्दुमकी गाजवणारा आणि नामुष्की पत्करणारा खेळाडू एकच असला तर नवलच. पण क्रिकेटची दुनिया नवलाईची आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन खेळाडूंच्या नावावर अशी नवलाई नोंदली गेली आहे. यात पहिला आहे आपल्या भारताचा युवराज सिंग आणि दुसरा आहे श्रीलंकेचा थिसारा परेरा. या दोघांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाज म्हणून एकाच षटकात ३० पेक्षा अधिक धावा केल्यासुध्दा आहेत आणि त्यांनीच गोलंदाज म्हणून गमावल्यासुध्दा आहेत.

 युवराजच्या  नोंदी आंतरराष्ट्रीय  टी-२० आणि वन डे सामन्यांतील आहेत तर परेराच्या वाट्याला आलेले दोन्ही प्रसंग वन डे इंटरनॅशनलचे आहेत. युवराजचा एकाच षटकात लागोपाठ सहा षटकार लगावण्याचा पराक्रम सर्वांनाच माहित आहे. २००७ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत त्याने इंग्लंडच्या स्ट्युअर्ट ब्रॉडची गोलंदाजी अक्षरशः फोडून काढली होती. ही खेळी करताना युवराजने बहुतेक दिमित्री मस्केरान्हसवरचा सारा संताप कदाचित ब्रॉडवर काढला होता कारण, युवीने सलग सहा षटकार लगावण्याच्या १५ दिवस आधीच मस्केरान्हसने ओव्हलवरच्या वन डे सामन्यात युवराजच्या गोलंदाजीवर लागोपाठ पाच षटकार खेचले होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात ३० पेक्षा अधिक धावा देणारा आणि घेणारा युवराज हा पहिलाच फलंदाज ठरला होता. 

त्यानंतर आता श्रीलंकेच्या थिसारा परेराच्या नावावर हा दूर्मिळ विक्रम लागलाय. परेराची गोलंदाजी आज न्यूझीलंडच्या जेम्स निशॕमने फोडून काढताना एकाच षटकात ६,६,६,६,२(नो बॉल), ६ आणि १ अशा एकूण ३४ धावा वसूल केल्या. मात्र याच परेराने २०१३ मधील पल्लेकल येथील वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या रॉबिन पीटरसनच्या षटकात ६, वाईड, ६,६ ६, ४, ६ अशा तब्बल ३५ धावा केल्या होत्या.

टॅग्स :युवराज सिंग