मुंबई : घरच्या मैदानावर तुफानी कामगिरी केलेल्या भारतीय क्रिकेट संघापुढे आता दक्षिण आफ्रिकेच्या खडतर दौ-याचे आव्हान आहे. विशेष म्हणजे या दौ-यात यशस्वी कामगिरी करुन परदेशातील भारतीय संघाचा रेकॉर्ड सुधारण्याचे मुख्य आव्हान ‘विराट सेने’पुढे आहे. मात्र असे असले तरी, ‘आम्हाला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवण्याची गरज नाही,’ असे स्पष्ट मत कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले आहे.
५ जानेवारीपासून सुरु होत असल्याने दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या दौºयासाठी भारतीय संघ बुधवारी मुंबईहून रवाना झाला. त्याआधी प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार कोहली यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. गेल्या २५ वर्षांमध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेमध्ये एकही कसोटी मालिका जिंकलेली नसून हा रेकॉर्ड बदलण्याची संधी विराट सेनेकडे असल्याचे मत अनेक दिग्गजांनी व्यक्त केले आहे.
याविषयी कोहलीने म्हटले की, ‘आम्ही परदेश दौरे आणि स्वत:ला सिद्ध करण्याच्या मानसिक दबावातून स्वत:ला पुढे नेले आहे. आम्हाला कोणालाही स्वत:ला सिद्ध करुन दाखवायची आवश्यकता नाही. मालिकेचा निकाल काहीही लागो, पण दौºयावर आम्हाला आमचा सर्वोत्तम खेळ सादर करायचा आहे.’
त्याचवेळी, सर्वांना वस्तुस्थितीचा स्वीकार करण्याची गरज असल्याचे सांगताना कोहलीने म्हटले की, ‘आपल्याला वस्तुस्थितीचा स्वीकार करण्याची आवश्यकता आहे. सध्या ज्या काही मालिका जिंकल्या आहेत, त्या रणनितींवर अंमलबजावणी करावी लागेल. आम्ही बाहेर क्रिकेट खेळायला जात आहोत, त्यामुळे दक्षिण आफ्रिका, आॅस्टेÑलिया, इंग्लंड किंवा भारत यापैकी आम्ही कुठे खेळत आहोत याला महत्त्व ठरत नाही.’
दक्षिण आफ्रिकेतील उसळणाºया खेळपट्ट्यांवर भारतीय संघाला आतापर्यंत केवळ दोन कसोटी सामने जिंकण्यात यश आले आहे. २०१०-११ सालच्या दौºयात भारताने आतापर्यंतची चांगली कामगिरी करताना १-१ अशी मालिका बरोबरीत राखली होती. याविषयी कोहलीने म्हटले की, ‘एक फलंदाज म्हणून तुम्ही कोणत्या मानसिकतेने खेळत आहात, यावर हे सर्व अवलंबून आहे. भारतीय परिस्थितींमध्येही अडचणी येऊ शकतात. जर तुम्ही मानसिकरीत्या खेळता नसाल, तर तुम्ही कोणत्या परिस्थितीत खेळत आहात, याला महत्त्व नसते. प्रत्येक आव्हानाला सर्वप्रथम मानसिकरीत्या सामोरे जावे लागेल आणि त्यानंतर सर्व परिस्थिती घरच्या परिस्थितींप्रमाणे भासतील.’
>उत्सुकता आहे
मी दक्षिण आफ्रिकेमध्ये एकदाच कसोटी क्रिकेट खेळलो आहे. पण आता मला या मालिकेची उत्सुकता आहे. तसेच, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना तेथे खेळण्याचा अनुभव आहे. आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आम्ही रोमांचित होतो आणि त्यामुळे आम्ही चांगले प्रदर्शन केले.
- विराट कोहली