Join us  

आम्ही एकमेकांकडे ट्रॉफी सोपवित आहोत - महेंद्रसिंग धोनी

‘हा मजेदार खेळ असून, यात दोन संघ एकमेकांकडे ट्रॉफी सोपवीत असल्याचे दिसून येते.’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 1:05 AM

Open in App

हैदराबाद : अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध एका धावेने पराभव स्वीकारावा लागल्यानंतर प्रतिक्रिया देताना चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी म्हणाला,‘हा मजेदार खेळ असून, यात दोन संघ एकमेकांकडे ट्रॉफी सोपवीत असल्याचे दिसून येते.’सुरुवातीला सामन्यात चेन्नईचे वर्चस्व होते. पण मधल्या षटकांमध्ये मुंबईने पुररागमन केले. असे वाटत होते की, शेन वॉटसन पुन्हा एकदा चेन्नईला जेतेपद पटकावून देईल. पण जसप्रती बुमराह व लसिथ मलिंगाने शानदार गोलंदाजी करीत पारडे फिरवले. धोनी म्हणाला,‘आम्ही एकमेकांकडे ट्रॉफी सोपवीत आहो, हे रंगतदार आहे. दोन्ही संघांनी चुका केल्या, पण विजेत्या संघाने एक चूक कमी केली.’चेन्नईला आठवेळा अंतिम फेरी गाठून देणारा कर्णधार धोनी समाधानी नाही. तो म्हणाला, ‘हे सत्र शानदार राहिले, पण आम्हाला आमच्या कामगिरीचे समीक्षण करावे लागेल. आम्ही फार चांगली कामगिरी केली नाही. मधल्या फळीला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही, पण आम्ही कसेतरी येथेपर्यंत पोहोचलो. आमच्या गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. गोलंदाजांनी आम्हाला शर्यतीत कायम राखले. फलंदाजीमध्ये प्रत्येक लढती कुणी एकाने चांगली कामगिरी केली आणि आम्ही विजय मिळवीत गेलो. पुढील वर्षी कामगिरीत सातत्य राखण्यासाठी आम्हाला बरीच मेहनत घ्यावी लागेल.’आता पूर्ण लक्ष विश्वकप स्पर्धेवर असल्याचे सांगत धोनी म्हणाला, ‘आत्ताच पुढील वर्षाबाबत सांगणे चुकीचे आहे. पुढील स्पर्धा विश्वचषक असून त्याच स्पर्धेला प्राधान्य राहील. त्यानंतर आम्ही चेन्नई सुपरकिंग्सबाबत चर्चा करू. पुढील वर्षी पुन्हा भेटू, अशी आशा आहे.’ (वृत्तसंस्था)

टॅग्स :महेंद्रसिंग धोनी