Join us  

भारत-पाकिस्तान क्रिकेट महायुद्धासाठी आता नऊ महिने प्रतीक्षा करा...

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषक स्पर्धेची अंतिम लढत होणार, या अपेक्षांना बुधवारी सुरूंग लागला. बांगलादेशने सुपर फोर गटातील सामन्यात पाकिस्तानचा पराभव करताना अंतिम फेरीत प्रवेश केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 3:07 PM

Open in App
ठळक मुद्देभारत आणि पाकिस्तान यांच्यात विश्वचषक स्पर्धेत सहावेळा समोरासमोरा आले आहेत आणि भारताने सर्व सामने जिंकले आहेत. 

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषक स्पर्धेची अंतिम लढत होणार, या अपेक्षांना बुधवारी सुरूंग लागला. बांगलादेशने सुपर फोर गटातील सामन्यात पाकिस्तानचा पराभव करताना अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे जेतेपदाच्या लढतीत भारत-पाकिस्तान महामुकाबला अनुभवण्यासाठी उत्सुक असलेल्या चाहत्यांची निराशा झाली आहे. या शेजारील राष्ट्रांचे संबंध पाहता भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मालिका होईल, असे तुर्तास तरी शक्य नाही. त्यामुळे भारत-पाकिस्तान क्रिकेट महायुद्धासाठी दोन्ही देशांतील चाहत्यांना नऊ महिने प्रतीक्षा पाहावी लागणार आहे. 

आशिया चषक स्पर्धेत भारताने साखळी आणि सुपर फोर गटात पाकिस्तानचा धुव्वा उडवला. स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही दोन्ही संघ समोरासमोर येतील अशीच शक्यता होती. मात्र, बांगलादेशने अनपेक्षित निकाल नोंदवला. त्यांनी सुपर फोर गटातील अखेरच्या सामन्यात पाकिस्तानवर 37 धावांनी विजय मिळवला. 239 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ 202 धावांवर माघारी परतला. त्यामुळे बांगलादेशने अंतिम फेरीत प्रवेश केला. 

आता भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी थेट जून 2019 मध्ये समोरासमोर येणार आहेत. इंग्लंडमध्ये होणाऱ्या वन डे विश्वचषक स्पर्धेत 16 जून 2019 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. तोपर्यंत हे संघ कोणत्याही स्पर्धेत समोरासमोर येण्याची शक्यता नाही.  त्यामुळे भारत-पाक क्रिकेट महायुद्धासाठी चाहत्यांना नऊ महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.

 

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तान