Join us  

विराटची आजची सेलिब्रिटी ब्रॅण्ड व्हॅल्यू 916 कोटींपेक्षा जास्त, शाहरुख खानला टाकलं मागे

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली फक्त क्रिकेटच्या दुनियेतला मौल्यवान खेळाडू नाहीय तर तो भारताचा सुद्धा किंमती ब्रॅण्ड आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 1:23 PM

Open in App
ठळक मुद्देमाजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची 9 व्या क्रमांकावरुन 13 व्या स्थानावर घसरण झाली आहे. पहिल्यांदाच या यादीत टॉप 15 मध्ये महिला खेळाडूला स्थान मिळाले आहे.

मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली फक्त क्रिकेटच्या दुनियेतला मौल्यवान खेळाडू नाहीय तर तो भारताचा सुद्धा किंमती ब्रॅण्ड आहे. विराटचे आजचे भारतीय बाजारपेठेतील सेलिब्रिटी मुल्य 916.42 कोटी रुपये आहे. डफ अँड फेल्सच्या अहवालानुसार विराटने सेलिब्रिटी ब्रॅण्ड व्हॅल्यूच्या या स्पर्धेत बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानला मागे टाकले आहे. शाहरुख 2014 पासून देशाचा सर्वात महागडा सेलिब्रिटी ब्रॅण्ड होता. 

माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची 9 व्या क्रमांकावरुन 13 व्या स्थानावर घसरण झाली आहे. सेलिब्रिटी ब्रॅण्ड व्हॅल्युच्या यादीत यावर्षी पी.व्ही.सिंधूचा समावेश झाला असून सिंधू 15 व्या स्थानी आहे. पहिल्यांदाच या यादीत टॉप 15 मध्ये महिला खेळाडूला स्थान मिळाले आहे. 2014 नंतर पहिल्यांदाच शाहरुखची घसरण झाली असून त्याची जागा विराटने घेतली आहे. 

मैदानावरील दमदार कामगिरीमुळे विराट कोहली आजच्या घडीला देशातील लोकप्रिय सेलिब्रिटी असून, कोहलीचं बहुतांश ब्रॅण्डसची पहिली पसंती आहे. विराटने भारतीय क्रिकेटकडे पाहताना फिटनेसबद्दलचं चित्र पूर्णपणे पालटून टाकलयं. स्टाईलमुळे आज तो तरुणांचा आदर्श आहे  असे पुमा इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक गांगुली यांनी सांगितले. विराटने यावर्षी पुमा बरोबर आठवर्षांचा करार केला. एकाच ब्रॅण्डबरोबर 100 कोटींचा करार करणार विराट पहिला क्रिकेटपटू ठरला. 

2015 मध्ये शाहरुख खान 879 कोटी रुपयासह पहिल्या स्थानावर होता. त्यावेळी विराट कोहली 619.75 कोटी मुल्यासह दुस-या स्थानावर होता. सलमान खान या यादीत 390.61 कोटीसह चौथ्या स्थानावर होता. सेलिब्रिटींची लोकप्रियता, जाहीरात फी, ब्रॅण्डसची संख्या, सोशल मीडियावरील लोकप्रियता, वय आणि ताजे मिळालेले यश याचा विचार करुन ब्रॅण्ड व्हॅल्यु ठरवली जाते. 

विराट अनुष्काने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट नुकतेच विवाहबंधनात अडकलेल्या विराट कोहली आणि अनुष्का शर्माने बुधवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी नवविवाहित जोडप्याने पंतप्रधानांचे आशीर्वाद घेतले. तर मोदींनीही विराट आणि अनुष्काला भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा विवाह 11 डिसेंबर रोजी इटलीमध्ये झाला होता. दरम्यान, लग्न आणि हनिमूननंतर विराट आणि अनुष्का भारतात परतले असून, काल त्यांचा गृहप्रवेशाचा कार्यक्रमही पार पडला होता. त्यानंतर आज विराट आणि अनुष्काने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी आयोजित केलेल्या रिसेप्शन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले.   

टॅग्स :विराट कोहली