Join us  

विराटची ‘चॅम्पियन्स’ खेळी युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी

भारतीय फिरकीपटूंविरुद्ध न्यूझीलंडच्या फलंदाजांनी तांत्रिकदृष्ट्या भक्कम खेळी करीत तीन सामन्यांच्या मालिकेत रविवारी आघाडी मिळविण्याचे खरे हकदार या नात्याने विजय संपादन केला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:40 AM

Open in App

सौरभ गांगुली लिहितात...भारतीय फिरकीपटूंविरुद्ध न्यूझीलंडच्या फलंदाजांनी तांत्रिकदृष्ट्या भक्कम खेळी करीत तीन सामन्यांच्या मालिकेत रविवारी आघाडी मिळविण्याचे खरे हकदार या नात्याने विजय संपादन केला. टॉम लॅथम आणि रॉस टेलर यांच्यातील मधल्या षटकातील भागीदारीमुळे भारतावर सहजरीत्या विजय साजरा होईल, याचे संकेत मिळाले होते. भारतीय कर्णधार विराट कोहलीने पार्टटाईम केदार जाधव वगळता सर्वच गोलंदाजांचा प्रयोग करून पाहिला, पण त्या दिवशी न्यूझीलंडच्या फलंदाजीला खिंडार पाडणे कुणालाही जमले नाही.न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने भारताला लवकर धक्का दिल्यानंतरही विराट शो पाहायला मिळाला. विराटच्या कामगिरीचे क्रिकेटविश्वाने कौतुक केले. त्याची क्षमता मांडण्यासाठी शब्द अपुरे आहेत. उकाडा, दमटपणा आणि हवेतील उष्णता या सर्व अडथळ्यांवर मात करीत चॅम्पियन्स कुणाला म्हणतात, हे विराटने वानखेडेवर सिद्ध केले.कुठल्याही परिस्थितीवर मात कशी करायची, हे युवा खेळाडूंनी कोहलीकडून शिकण्यासारखे आहे. वन-डे क्रिकेटमधील सचिनच्या विक्रमापासून तो काही पावले दूर आहे. पण हा विक्रम कुणी मोडू शकणार असेल तर तो कोहलीच असेल. विराटने मैदानावर झुंज दिली. मोलाची भागीदारी केली. दुसºया टोकाहून पाठोपाठ गडी बाद होत गेल्यानंतरही न डगमगता करिअरमधील अविस्मरणीय खेळी करीत राहिला. त्याच्या शतकाविना भारताची धावसंख्या फारच नीचांकी ठरली असती. त्यामुळेच विराटची ती खेळी महत्त्वपूर्ण ठरली. भारताने चौथ्या स्थानावर फलंदाजीसाठी अनेकांना आजमावले. या स्थानावर एखादा खंदा फलंदाजच हवा. कारण कुठल्याही विपरीत परिस्थितीत मात करण्यास आघाडीच्या चार फलंदाजांची गरज असते. न्यूझीलंडचा मारा अधिक भेदक वाटला. ट्रेंट बोल्टने भारतीय परिस्थितीत अप्रतिम मारा केला. भारतीय उपखंडात फिरकीचे वेगळे महत्त्व आहे. मिशेल सँटेनरने भारतीय दिग्गज फलंदाजांना अक्षरश: बांधून ठेवले होते. न्यूझीलंडने होमवर्क चांगले केल्याचे पहिल्या सामन्यातून निष्पन्न झाले आहे. गोलंदाजीशिवाय त्यांनी भारताच्या फिरकीपटूंचा सामना करण्यातही मुरब्बीपणा दाखविला. वानखेडेच्या फिरकीला पूरक खेळपट्टीवर लॅथम आणि टेलर यांची दडपणातील संयमी खेळी प्रभावी वाटली. कर्णधार केन विल्यम्सनने धावांचे योगदान दिल्यास आगामी सामन्यात आपण भारताला अडचणीत आणू शकतो, असा विश्वास पाहुण्यांना प्राप्त झाला आहे.भारतानेदेखील या पराभवामुळे निराश होण्याचे कारण नाही. सध्याच्या न्यूझीलंड संघाविरुद्ध मुसंडी मारण्याची क्षमता टीम इंडियात आहे. शिस्तबद्ध आणि योजनाबद्ध खेळणाºया न्यूझीलंडला नमविण्यासाठी भारतीय खेळाडूंनी शंभर टक्के योगदान द्यायलाच हवे. (गेमप्लान)

टॅग्स :सौरभ गांगुली