Join us  

विराट कोहली 62 शतकं ठोकेल, वीरेंद्र सेहवागचं भाकित

ज्या गतीने विराट कोहली शतकं करत आहे ते पाहता तो लवकरच सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड तोडेल असा विश्वास अनेकजण व्यक्त करत आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2018 4:14 PM

Open in App

मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू म्हणून पाहिला जात आहे. दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेत अखेरच्या सामन्यात शतक ठोकत आपली धावांची भूक अजून मिटलेली नाही हे विराट कोहलीने स्पष्ट केलं आहे. विराट कोहलीची तुलना आतापर्यंतच्या सर्व महान खेळाडूंशी केली जात असून यामध्ये पहिलं नाव आहे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं. ज्या गतीने विराट कोहली शतकं करत आहे ते पाहता तो लवकरच सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड तोडेल असा विश्वास अनेकजण व्यक्त करत आहेत. या सर्वांमध्ये एक नाव आहे ते एकेकाळचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागचं. 

विराट कोहलीचं क्रिकेट करिअर जेव्हा संपेल तेव्हा त्याने 62 शतकं पुर्ण केलेली असतील असं भाकित विरेंद्र सेहवागने वर्तवलं आहे. विराट कोहलीच्या नावे सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये 35 आणि कसोटी क्रिकेटमध्ये 21 शतकं केल्याचा रेकॉर्ड आहे. याचा अर्थ विरेंद्र सेहवागच्या मते विराट कोहली फक्त सचिनचा रेकॉर्ड तोडणार नाही तर त्याची 13 शतकं जास्त असतील. विशेष म्हणजे सचिन तेंडुलकरनेही विराट कोहलीच्या खेळीचं कौतुक केलं आहे. 

ट्विटरवर एका युजरने विरेंद्र सेहवागला विराट कोहली किती शतकं पुर्ण करेल असा प्रश्न विचारला होता. याला उत्तर देताना सेहवागने 62 असं सांगितलं. 

क्रिकेटचा देव समजल्या जाणा-या सचिन तेंडुलकरने 463 एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण 49 शतकं तर 96 अर्धशतकं केली होती. दुसरीकडे विराट कोहलीने फक्त 208 सामन्यांमध्ये 35 शतकांचा आणि 46 अर्धशतकांचा आकडा पार केला आहे. विराट कोहलीची सरासरी 58.10 आहे, जो सचिनपेक्षाही (44.83) जास्त आहे.

याआधीही काही दिवसांपुर्वी विरेंद्र सेहवागने विराट कोहलीचं आतापर्यंतचा सर्वोत्तम कर्णधार म्हणून कौतुक केलं होतं. 'मालिका जिंकण्याच्या बाबतीत कोहली सर्वोत्तम कर्णधार आहे. पण याचा अर्थ त्याची आधीच्या कर्णधारांशी तुलना करावी असा नाही. आधीच्या कर्णधारांनी जी उंची गाठली त्यासाठी विराटला अजून वेळ आणि संधी दिली पाहिजे', असं विरेंद्र सेहवाग बोलला होता.  

टॅग्स :विरेंद्र सेहवागविराट कोहली