विराट कोहली सर्वांत प्रभावशाली ठरला

स्वत: कोहलीसह शिखर धवन, रोहित शर्मा आणि कुलदीप यादव - युझवेंद्र चहल या फिरकी जोडीने यजमानांची डोकेदुखी वाढवली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 03:00 AM2018-02-20T03:00:36+5:302018-02-20T03:00:56+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli was the most influential player | विराट कोहली सर्वांत प्रभावशाली ठरला

विराट कोहली सर्वांत प्रभावशाली ठरला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अयाझ मेमन, संपादकीय सल्लागार
दक्षिण आफ्रिका दौ-यात कसोटी मालिका थोडक्यात गमावल्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने सहा सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ५-१ अशी बाजी मारत आपला एकहाती दबदबा राखला. स्वत: कोहलीसह शिखर धवन, रोहित शर्मा आणि कुलदीप यादव - युझवेंद्र चहल या फिरकी जोडीने यजमानांची डोकेदुखी वाढवली. त्याचबरोबर इतर खेळाडूंनी मोक्याच्या वेळी आपले योगदान देत निर्णायक भूमिका बजावली. एकदिवसीय मालिकेतील कामगिरीनुसार ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक अयाझ मेमन यांनी ‘लोकमत’ वाचकांसाठी ‘विराट सेनेचे’ रिपोर्ट कार्ड मांडले आहे...


विराट कोहली १० पैकी १० गुण
कोहलीची फलंदाजी सध्या सर्वोच्च स्तराची आणि नेत्रदीपक झाली आहे. सहा सामन्यांत ३ शतके आणि मालिकेत ५००हून अधिक धावा यावरून त्याचा जागतिक दर्जा सिद्ध होतो. याशिवाय आक्रमक नेतृत्वाने तो अत्यंत वेगळा ठरतो. एकूणच मालिकेत तो सर्वांत प्रभावशाली खेळाडू ठरला.

केदार जाधव १० पैकी १
ही मालिका केदारसाठी विसरण्याजोगी असेल. तीन सामन्यांतून त्याला केवळ एकदाच फलंदाजीची संधी मिळाली आणि त्यात त्याने केवळ एक धाव काढली. तसेच, गोलंदाजीतही त्याला काहीच मिळवता आले नाही.


शिखर धवन
१० पैकी ७.५
एकदिवसीय मालिकेत चांगल्या फॉर्ममध्ये राहिलेल्या धवनने आपल्या १००व्या सामन्यात शतकी खेळी केली. पण यावरून तो कसोटी मालिकेत कसा अपयशी ठरला असाही प्रश्न पडतो. त्याला यातून शिकावे लागेल.

हार्दिक पांड्या १० पैकी ४
हार्दिकचे अष्टपैलुत्व फारच क्वचित दिसले. फलंदाजीत तो कधीच परिणामकारक दिसला नाही, गोलंदाजीत मात्र छाप पाडली. संघातील स्थान भक्कम करण्यासाठी त्याला दोन्ही क्षेत्रांमध्ये आणखी मेहनत घ्यावी लागेल.

अजिंक्य रहाणे १० पैकी ६
अतिरिक्त सलामीवीर म्हणून संघात स्थान असलेल्या रहाणेला कर्णधार कोहलीने चौथ्या क्रमांकावर खेळवले. कारण या क्रमांकावर तो संघासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. तरीही अजूनही त्याच्याकडून मोठ्या खेळीची प्रतीक्षा आहे.

श्रेयस अय्यर १० पैकी ४
तीन सामन्यांत श्रेयसला मनिष पांड्येच्या जागी स्थान मिळाले. पण तरी त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. अनेक फटके आपल्या भात्यात असलेल्या श्रेयसला मोठी खेळी कशी उभारावी हे शिकावे लागेल.

भुवनेश्वर कुमार १० पैकी ३
कसोटी मालिकेप्रमाणे भुवी एकदिवसीय मालिकेत प्रभावी दिसला नाही. पाच सामन्यांत त्याला लौकिकानुसार बळी घेता आले नाहीत आणि इकॉनॉमी रेटही खूप खराब राहिला. पण तरीही तो संघासाठी महत्त्वाचा खेळाडू ठरत आहे.

रोहित शर्मा १० पैकी ४.५
मालिकेत झळकावलेल्या एकमेव शतकातून पुन्हा एकदा रोहितची गुणवत्ता दिसून आली. पण इतर सामन्यात अपयशी ठरल्याने पुढील विदेशी मैदानावर होणाºया सामन्यांसाठी त्याला सांभाळून खेळावे लागेल. एकूणच द. आफ्रिका दौरा त्याच्यासाठी आनंदाचा ठरला नाही.

महेंद्रसिंग धोनी १० पैकी ५.५
नेहमीप्रमाणे धोनी यष्ट्यांमागे अप्रतिम होता, पण त्याचवेळी यष्ट्यांच्या पुढे मात्र त्याला फारशी चमक दाखविता आली नाही. मालिकेतील एका शानदार खेळीचा अपवाद वगळता तो अपयशी ठरला. तसेच टायमिंग साधण्यात आणि फिनिशिंग करण्यातही तो झुंजताना दिसला. परंतु चहल व कुलदीप यांना मार्गदर्शन करण्यात धोनीने मोलाचे योगदान दिले.


कुलदीप यादव
- युझवेंद्र चहल
१० पैकी १०
या दोघांनी जबरदस्त कामगिरी करताना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांभोवती फिरकीचे जाळे विणून ५१पैकी तब्बल ३३ बळी मिळवले. शिवाय हे सर्व बळी मिळवताना दोघांनीही खूप कमी धावा दिल्या. रविचंद्रन आश्विन आणि रवींद्र जडेजा यांना वगळून या दोघांना संधी देण्याचा निर्णय धोकादायक वाटला होता. पण सध्या हे दोघेही गोलंदाज संघाचे हुकमी एक्का बनले आहेत. कोहलीकडून मिळत असलेला विश्वास आणि कोणत्याही दडपणाशिवाय गोलंदाजी करीत असल्याने दोघांनाही बळी मिळविण्यात अडचण होत नाही.

शार्दुल ठाकूर १० पैकी ७.५
शार्दुलला मालिकेत केवळ एक सामना खेळण्याची संधी मिळाली आणि ती संधी त्याने साधली. त्याने चार बळी घेत आपली उपयुक्तता सिद्ध केली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपल्याला अधिक संधी मिळायला पाहिजे, असे त्याने आपल्या कामगिरीतून संघ व्यवस्थापनापुढे मांडले.

जसप्रीत बुमराह १० पैकी ८.५
कसोटी क्रिकेटमध्ये चमकदार पदार्पण केल्यानंतर बुमराहने एकदिवसीय मालिकेतही तीच कमागिरी पुढे कायम ठेवली. त्याने कमी धावा देताना ८ बळी मिळवले. संघातील सर्व गोलंदाजांवर नजर टाकल्यास तो एकदिवसीय क्रिकेटमधील जगातील सर्वोत्तम गोलंदाज असल्याचे स्पष्ट होते.

Web Title: Virat Kohli was the most influential player

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.