Virat Kohli Retirement RCB : भारतीय संघ आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. भारताचा रनमशिन विराट कोहली IPL नंतर थेट आता १९ ऑक्टोबरला क्रिकेटच्या मैदानावर खेळताना दिसणार आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध विराटचा रेकॉर्ड उत्तम आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल सध्या बरीच चर्चा रंगली आहे. विराटचे चाहतेही खुश आहेत. पण याचदरम्यान, विराटच्या आणि RCBच्या चाहत्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. IPL च्या पुढील हंगामात मोठे फेरबदल होऊ शकतात असे सांगितले जात आहे. अशातच विराट कोहली IPL मधून निवृत्त होणार का, असा सवाल विचारला जात आहे. त्यामागे कारणही तसेच आहे.
विराट कोहली IPL मध्ये निवृत्त होणार?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)चा स्टार विराट कोहली याने अद्याप फ्रँचायझी सोबत व्यावसायिक करार केलेला नाही. कोहली आणि आरसीबी फ्रँचायझीमध्ये सर्व काही ठीक नसल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. IPL च्या सुरुवातीपासून कोहली RCB सोबत आहे. पण IPLच्या मिनी-लिलावापूर्वी कोहलीने नव्या करारावर स्वाक्षरी न केल्याने तो ही फ्रँचायझी सोडू शकतो किंवा IPLमधून निवृत्ती घेऊ शकतो अशा चर्चा रंगल्या आहेत.
विराट RCB सोडणार नाही!
माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने या चर्चांना तथ्यहीन म्हटले आहे. तो म्हणाला की, RCB सोबत व्यावसायिक करारावर स्वाक्षरी न करणे याचे वेगळे अर्थ असू शकतात. कोहलीने व्यावसायिक करारावर स्वाक्षरी न करणे म्हणजेच संघाची मालकी लवकरच बदलू शकते असाही याचा अर्थ असू शकतो. त्याच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना कैफ म्हणाला की कोहली त्याच्या शब्दावर ठाम आहे आणि IPL मध्ये तो कधीही त्याचा संघ बदलणार नाही.
विराट कोहलीचे सूचक पोस्ट
विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त एकदिवसीय सामन्यातच खेळताना दिसणार आहे. कॅमबॅकच्या चर्चेसोबत त्याच्या आंतरारष्ट्रीय कारकिर्दीतील भविष्यासंदर्भात चर्चा रंगत आहेत. अशातच त्याच्या खास पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विराट कोहलीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेआधी किंग कोहलीने अधिकृत एक्स अकाउंटवरुन अपयश आणि पराभव यावर भाष्य करणारी पोस्ट शेअर केली आहे. 'ज्यावेळी तुम्ही हार मानता, तो क्षण तुमच्यासाठी अपयशाचा क्षण असतो,' असे त्याने म्हटले आहे. यातून मोजक्या शब्दांत कोहलीने प्रेरणादायी संदेश दिल्याचे दिसते.