Join us  

विराट कोहली-रोहित शर्मा यांच्यातील कथित वादावर संघ व्यवस्थापनाचं मोठं विधान 

वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर भारतीय संघात दोन गट पडल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 11:02 AM

Open in App

मुंबई : वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर भारतीय संघात दोन गट पडल्याच्या चर्चांना उधाण आले होते. भारतीय संघात विराट कोहली आणि रोहित शर्मा असे दोन गट झाल्याची चर्चा होती. शिवाय प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या कामकाज करण्याच्या शैलीवरही अनेक खेळाडू नाराज असल्याचेही समोर आले होते. कोहली-रोहितच्या वादामुळे आगामी काळात दोन कर्णधार असा पर्यायही बीसीसीआयच्या विचाराधीन होत असल्याची चर्चा रंगली. पण, या सर्व गोष्टींचा संघ व्यवस्थापनाकडून खुलासा करण्यात आला आहे. कोहली-रोहित यांच्यातील वाद ही निव्वळ अफवा असल्याचे संघ व्यवस्थापनानं स्पष्ट केलं.''ही अफवा आहे. अशा अफवा पसरवून संघात फुट पाडण्याचा हा प्रयत्न म्हणावा लागेल. कोणता खेळाडू दुसऱ्याचं वाईट विचार करेल? वर्ल्ड कप स्पर्धा संपली आहे आणि लोकांना नवीन हेडलाईन हवी आहे. काही लोकं स्वतःच्या फायद्यासाठी कशाप्रकारे चुकीच्या बातम्या पसरवत आहेत, याचे दुःख वाटते,'' अशी प्रतिक्रिया संघ व्यवस्थापनातील सदस्यानं दिली. 

वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आता भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. तेथे तीन वन डे आणि तीन ट्वेंटी-20 सामन्यांसह दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. 3 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात भारतीय संघात काही नवीन चेहरे पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड 19 जुलैला होणार आहे. विंडीज दौऱ्यात  मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांना विश्रांती दिली जाऊ शकते. याशिवाय माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीलाही विश्रांती देण्याची शक्यता आहे.

विराट कोहलीनं या मालिकेत खेळणार असल्याची इच्छा व्यक्त केली आहे. शिवाय शिखर धवन आणि विजय शंकरही दुखापतीतून सावरले आहेत आणि तेही कमबॅक करू शकतात.  पण, त्याबाबत सूत्रांनी सांगितले की,'' शिखर धवन आणि विजय शंकर यांच्याबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. निवड समिती प्रमुख त्यावर निर्णय घेतील.''   

टॅग्स :वर्ल्ड कप 2019रोहित शर्माविराट कोहलीभारत विरुद्ध वेस्ट इंडिज